जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा तालुक्यातून एका मोटार सायकल चोरट्यास ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांचा सुगावा लागल्याने पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला आहे. दिपक सुनिल खरे (22) शहापुरा ता. पाचोरा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुभम राजेंद्र परदेशी ( शहापुरा पाचोरा) हा पसार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहेत.
पाचोरा तालुक्यातील शहापुरा येथील काही महाविद्यालयीन तरुण कुठलाही कामधंदा न करता केवळ मौजमस्ती करण्याकामी पैशांची उधळपट्टी करत असल्याची माहिती पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. या महाविद्यालयीन तरुणांची माहिती घेण्याकामी त्यांनी पथकाला रवाना केले होते.
दिपक सुनिल खरे या तरुणास ताब्यात घेत विचारपुस केली असता त्याने तिन मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले. सखोल चौकशीत त्याने त्याचा साथीदार शुभम राजेंद्र परदेशी याचे नाव सांगितले. दोघांनी मिळून पहुर, पिंपळगाव हरेश्वर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा पोलिस स्टेशन हद्दीतून मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले. त्या मोटार सायकली त्याने पोलिसांना काढून दिल्या. मात्र त्याचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला. पुढील कारवाईकामी अटकेतील दिपक खरे यास पहुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पो.नि. किरण कुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हवालदार सुनिल दामोदरे, दिपक पाटील, पोलिस नाईक नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, सचिन महाजन, चालक अशोक पाटील, मुरलीधर बारी यांनी तपासकामी सहभाग घेतला.