जळगाव – कैलास पांडुरंग शिंगाणे हा अमळनेर शहरातील तरुण उद्योजक होता. उद्योगधंदा करण्याची त्याच्यात प्रचंड तळमळ होती. उद्योगधंद्यात स्वत:ला वाहून घेण्याची अंगी जिद्द आणि धमक असल्यामुळे त्याने चांगली धनसंपदा जमवली होती. सुस्वरुप पत्नी व मुलांचा धनी असलेल्या कैलासने वयाच्या अवघ्या तिशीत अमळनेर शहरातील हाशिमजी प्रेमजी या व्यापारी संकुलाच्या दुस-या मजल्यावर एक गाळा घेतला. सन 2012 मधे घेतलेल्या त्या गाळ्यात त्याने आईस्क्रीम पॉर्लरचा व्यवसाय सुरु केला. सलग आठ वर्ष कैलासने आईस्क्रिमचा विक्रीचा व्यवसाय यशस्वीपणे चालवला.
अजुन काहीतरी नविन करायचे आणि चांगले उत्पन्न मिळवायचे या लक्ष्मीप्राप्तीच्या विचाराने कैलास झपाटला होता. कैलासने केबल नेटवर्कच्या व्यवसायात पदार्पन करण्याचा विचार केला. प्रत्येक मनुष्याला चांगल्या प्रकारे व चांगल्या प्रमाणात धन कमावण्याची, नाव कमावण्याची संधी जिवनात अवश्य मिळत असते. तशी संधी कैलासला आईस्क्रिमच्या व्यवसायातून मिळाली होती.
चालू स्थितीत असलेला आईस्क्रिमचा व्यवसाय बंद करुन केबलचा व्यवसाय सुरु करण्याचे कैलासने मनाशी ठरवले. त्यानुसार आईस्क्रीमचा व्यवसाय सुरु असलेल्या गाळ्यातच त्याने दोन वर्षापुर्वी केबल व्यवसायाला लागणारी मशिनरी आणली. अमळनेर शहरात केबल ग्राहकांचे जाळे तयार केले. केबल कनेक्शन देण्यासाठी त्याने रोजंदारीने मजुर लावले. प्रचंड जिद्द असलेल्या कैलासने केबलच्या व्यवसायात देखील जोमाने सुरुवात केली.
सन 2020 मधे सुरु केलेल्या केबलच्या व्यवसायात कैलासने अनेक अडचणींचा सामना केला. सुमारे 35 लाख रुपयांचे भांडवल त्यात अडकून पडले. केबलच्या व्यवसायात कैलासला नंतर मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले. कधी मजुरांचा तर कधी मटेरियलचा प्रश्न सोडवण्यात कैलास गुंतला होता. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रतिस्पर्धी व्यावसायिकांच्या तुलनेत ग्राहकांना चांगली सेवा देण्याकामी कैलासला रात्रंदिवस मेहनत घेण्याची वेळ आली. त्या तुलनेत पुर्वीचा आइस्क्रिम विक्रीचा व्यवसाय सुखकर होता. केबल नेटवर्कच्या व्यवसायातील नुकसान भरुन काढण्यासाठी कैलासने खुप विचाराअंती त्याच्या नावे असलेल्या जमीनीचे काही प्लॉट विक्री काढले. प्लॉट विकल्यानंतर आलेल्या रकमेतून कैलासने तोट्याचे खड्डे भरुन काढले.
अमळनेर शहरातील जुना पारधी वाडा भागात प्रकाश दत्तात्रय चौधरी हा तरुण रहात होता. त्याच्या अंगी देखील व्यवसाय करण्याची जिद्द होती. एके दिवशी त्याने कैलासची भेट घेतली. केबल नेटवर्क व्यवसायात सामील करुन घेण्यासाठी त्याने कैलासला गळ घातली. आपण रहात असलेल्या परिसरात केबल कनेक्शन ग्राहकांचे जाळे तयार करण्याची व त्या माध्यमातून पैसे कमावण्याची तयारी प्रकाशने कैलासला दाखवली. प्रकाश रहात असलेल्या परिसरासाठी त्याला केबल नेटवर्कचे काम देण्याची सहमती कैलासने दर्शवली. मात्र त्यापोटी कैलासने त्याच्याकडून एक लाख रुपये घेतले. प्रकाशने देखील कैलासला एक लाख रुपये दिले.
काही दिवसांनी कैलासच्या असे लक्षात आले की प्रकाश रहात असलेल्या भागातून सुरत – भुसावळ रेल्वे लाईन गेली आहे. त्यामुळे त्या भागात केबलची वायर टाकणे शक्य होणार नसल्याचे कैलासच्या लक्षात आले. केबलच्या ग्राहकांचा विस्तार करण्याचे काम प्रकाशला देणे शक्य नसल्यामुळे कैलासने त्याचे एक लाख रुपये आठ महिन्यांनी परत केले. आठ महिने आपले एक लाख रुपये वापरल्यामुळे त्याचे प्रतिमहिना पाच हजार रुपये याप्रमाणे व्याज मिळण्यासाठी प्रकाशने कैलासकडे तगादा सुरु केला.
प्रकाशचा तगादा सुरु असतांनाच त्याला ग्राहकांच्या सतत तक्रारी येऊ लागल्या. टिव्हीवर प्रक्षेपण निट दिसत नसल्याच्या वा दिसतच नसल्याच्या त्या तक्रारी होत्या. आपण चांगल्या प्रतीची वायर टाकून देखील ग्राहकांच्या तक्रारी का येतात? याची शहानिशा करण्यासाठी कैलास स्वत: संबंधीत ग्राहकांकडे व त्या परिसरात जाऊन पाहणी करु लागला. त्यावेळी त्याच्या असे लक्षात आले की आपली केबलची वायर कुणीतरी वारंवार कापून टाकत आहे. त्यामुळे नाईलाजाने कैलासला ती महागडी वायर मजुरांच्या मदतीने बदलावी लागत होती. काही दिवसांनी विविध भागातील ग्राहकांच्या तक्रारींचा जणू काही पुरच आला. प्रत्येक ठिकाणी केबल वायर कुणीतरी कटरने कापून ठेवल्याचे दृश्य त्याला दिसत होते. त्यामुळे अगोदरच तोट्यात असलेला कैलास मटेरियल आणि लेबर चार्जेस वाढल्यामुळे हैरान झाला. ग्राहकाकडून मिळणारे ठरावीक उत्पन्न आणि वारंवार तुटलेल्या केबलची जोडणी करण्याचा नव्याने उद्भवलेला खर्च याचा ताळमेळ बसवणे त्याला कठीण झाले होते. हे कटकारस्थान कोण करतो याचा तपास लावण्याचे त्याने मनाशी ठरवले.
त्याने लावलेल्या तपासात त्याला आपलाच एक प्रतिस्पर्धी आणि त्याच्या जोडीला प्रकाश चौधरी असे दोघे जण आढळून आले. एका प्रतिस्पर्धी व्यावसायीकाच्या सांगण्यावरुन प्रकाश चौधरी हे काम करत असल्याचे कैलासच्या लक्षात आले. त्या प्रतिस्पर्धी व्यावसायीकाचा प्रकाश चौधरी हा लाभार्थी असल्याचे कैलासच्या लक्षात आले. ज्या भागात कैलासने केबल कनेक्शन दिले आले आहे त्या भागातील वायर कापल्यास लोक वैतागून त्याचे कनेक्शन बंद करतील व आपले कनेक्शन घेतील असा प्रतिस्पर्धी व्यावसायीकाचा त्यामागे हेतू होता. केबल वायर तोडल्यानंतर त्या प्रतिस्पर्धी व्यावसायीकाने प्रकाश चौधरी यास पाच हजार रुपये देण्याचे कबुल केल्याचे म्हटले जाते. अशा प्रकारे त्या प्रतिस्पर्धी व्यावसायीकासह प्रकाश चौधरी अशा दोघांचा फायदा होत असे.
प्रकाशचा कैलाससोबत व्यवहाराचा वाद सुरु होता. त्यामुळे त्या वादाचा गैरफायदा प्रतिस्पर्धी केबल व्यावसायीकाने प्रकाशच्या माध्यमातून घेण्याचे ठरवले होते असे म्हटले जाते. हा सर्व प्रकार कैलासला समजला होता. अगोदरच कर्जाच्या ओझ्यामुळे दबलेला कैलास या नुकसानीमुळे मेताकुटीला आला होता. त्याच्या मनात अधूनमधून आत्महत्येचे विचार येत होते. मात्र तो अधुनमधून शांत डोक्याने विचार करत तो विचार परतवून लावत होता.
आपली केबल वायर तोडणा-या प्रकाशच्या मुखातून खरा प्रकार ऐकून घेण्याचे कैलासने ठरवले. त्यासाठी त्याने व्युहरचना सुरु केली. मनातून प्रकाशवर चिडलेला कैलास तो समोर आला तरी त्याच्यासमोर राग व्यक्त करत नव्हता. मनात राग असला तरी आता प्रकाश समोर आल्यावर कैलास त्याचे हसतमुखाने स्वागत करु लागला. कैलासने आता प्रकाशसोबत जवळीक वाढवली. तो गोड बोलून त्याला सोबत फिरायला घेऊन जाऊ लागला. प्रकाशसोबत त्याच्या परिसरातील एक मुलगा नेहमी सोबत रहात होता. त्या मुलाला देखील प्रकाश प्रमाणे कैलास सोबत घेऊ लागला. हॉटेलमधे कैलास व त्याच्यासोबत राहणा-या मुलाची खानपान व्यवस्था कैलास करु लागला.
24 ऑगस्ट रोजी कैलास त्या दोघांना धरणगाव येथे घेऊन गेला. सायंकाळी तिघांनी सोबतच जेवण व मद्यप्राशन केले. त्यावेळी मद्याच्य नशेत प्रकाश व त्याच्यासोबतच्या मुलामधे आपसात भांडण झाले. त्या भांडणाचे कारण कैलासने त्या मुलाला शिताफीने हळूच विचारले असता त्याला धक्काच बसला. त्या मुलाने कैलासला सांगितले की तुझ्या केबलच्या वायरी कापण्यासाठी प्रकाश मला पैसे देऊन पाठवत होता. त्या मुलाकडून सर्व ऐकून घेतल्यानंतर देखील कैलास गप्प बसला. त्यानंतर तिघे आपापल्या घरी परत आले.
दुस-या दिवशी 25 ऑगस्ट रोजी कैलासने प्रकाशला सोबत घेत चोपडा गाठले. सोबत मद्याचा बंपर पॅक देखील कैलासने प्रकाशसाठी विकत घेतला. चोपडा येथे गेल्यावर कैलासच्या पैशावर प्रकाशने त्याचे काही विशीष्ट शौक देखील पुर्ण केले. काय हवे – नको त्याची कैलासने प्रकाशला विचारणा केली. त्यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघे जण एका हॉटेलमधे मद्यप्राशन करण्यास बसले. यावेळी कैलासकडे एक धारदार कटर होते. त्या कटरने प्रकाशला जिवानिशी ठार करण्याचा विचार कैलासच्या मनात चमकला. तसा प्रयत्न देखील त्याने करुन पाहीला. मात्र कैलासची हिंमत झाली नाही. त्यामुळे तो या कृत्यापासून माघारी परतला. त्यानंतर अमळनेर येथील हाशीमजी प्रेमजी या व्यापारी संकुलात असलेल्या कैलासच्या दुकानावर दोघे आले. त्या ठिकाणी पुन्हा दोघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर दोघे आपापल्या घरी परतले.
26 ऑगस्ट रोजी प्रकाशचा कायमचा काटा काढण्याचे कैलासने मनोमन ठरवले. त्याने तशी मनाची तयारी देखील केली. त्यासाठी कैलासने सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एका जनरल स्टोर्समधून किचनमधे वापरला जाणारा एक धारदार चाकू विकत घेतला. आज प्रकाशला या जगातून कायमचे हद्दपार करण्याचे कैलासने मनाशी पक्के ठरवले होते. त्यानुसार त्याने नियोजन केले. सायंकाळी कैलासने प्रकाशला मद्याच्या नशेत धुंद करण्यासाठी एक लिटर मद्याचा बंपर पॅक विकत घेतला.
ठरल्यानुसार सायंकाळी नियोजीत हॉटेलवर दोघे एकत्र आले. तेथे दोघांनी मद्यप्राशन केल्यानंतर दोघे पुन्हा अमळनेर येथील कैलासच्या दुकानावर परत आले. प्रकाश मद्याच्या धुंदीत असतांना कैलासने त्याच्याकडे केबल वायर कापण्याचा मुळ विषय बाहेर काढला. त्यावेळी प्रकाश कबुल झाला व खरे बोलू लागला. त्याने कबुल केले की त्याच्या केबल कनेक्शनच्या वायरी कापण्यासाठी त्याला प्रतिस्पर्धी केबल ऑपरेटरकडून पैसे मिळत होते. केबलच्या वायरी प्रकाश कापत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याने कैलासकडे तशी कबुली देखील दिली होती. त्यामुळे आतापर्यंत शांत असलेला व त्याच्यावर मद्यपानाससह जेवणासाठी पैसे उधळणारा कैलास जाम भडकला.
त्यावेळी रात्रीचे साडे अकरा वाजले होते. रात्र बरीच झालेली असल्यामुळे परिसरातील सर्व दुकाने बंद झाली होती. दुकान बंद करुन कैलाससह प्रकाश बाहेर व्हरांड्यात आला. त्यावेळी दोघात केबलच्या वायरी कापण्यावरुन पुन्हा वाद सुरु झाला. तो वाद कैलासने सुरु केला होता. कैलासने त्याचवेळी त्याच्याजवळ असलेला धारदार चाकू बाहेर काढला. कैलासने चाकूचा वार प्रकाशवर केला. वार चुकवण्यासाठी प्रकाश खाली वाकला. खाली वाकताच तो चाकू प्रकाशच्या गळ्याला लागला. चाकू गळ्याला लागताच प्रकाश खाली कोसळला. खाली कोसळलेल्या प्रकाशच्या मानेवर कैलासने दोन वेळा वार केले. गळ्यावर धारदार चाकूचे वार बसल्यामुळे प्रकाश तेथेच ठार झाला. प्रकाश ठार झाल्याचे दिसताच कैलासने त्याचा मोबाईल काढून घेतला. तो मोबाईल व रक्ताने माखलेला चाकू अशा दोन्ही वस्तू कैलासने दुकानातील टेबलच्या ड्रावरमधे ठेवून दिल्या. त्यानंतर कैलास आपल्या घरी परतला.
दुस-या दिवशी 27 ऑगस्ट रोजी कैलास सकाळी लवकर उठला. भल्या पहाटे लवकर उठून त्याने अंघोळ आटोपली. रक्ताने भरलेला शर्ट त्याने पटापट धुऊन काढला. कुणाला काही न सांगता कुणाशी फार काही न बोलता त्याने चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे सासरवाडी गाठली. दरम्यान सकाळी प्रकाश चौधरीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह परिसरातील लोकांच्या नजरेस पडला. घटनास्थळी गर्दी जमण्यास वेळ लागला नाही. या घटनेची वार्ता अमळनेर शहरात वा-यासारखी पसरली. अमळनेर पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती मिळताच पो.नि. जयपाल हिरे यांच्यासह स.पो.नि. राकेशसिंग परदेशी, अंमलदार सुनिल हटकर, हे.कॉ. किशोर पाटील, प्रमोद पाटील, पोलिस नाईक मिलींद ब्राम्हणे आदींनी घटनास्थळ गाठले. मयत प्रकाश याचे वडील दत्तात्रय चौधरी यांना या घटनेची माहिती मिळताच ते देखील घटनास्थळी हजर झाले. आपल्या मुलाचा मृतदेह बघून त्यांनी हंबरडा फोडला.
आपल्या मुलाचा व केबलचा व्यवसाय करणारा कैलास शिंगाणे यांच्यात गेल्या कित्येक दिवसांपासून व्यवहाराचा वाद असल्याचे त्यांना माहिती होते. घटनास्थळ देखील कैलासच्या दुकानाजवळचे असल्यामुळे त्या वादाची किनार या हत्येला असावी असा संशय त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला. दत्तात्रय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 361/21 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला. पोलिस पथकाने घटनास्थळासह मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदकामी रुग्णालयात नेण्यात आला. मृतदेहाची ओळख पटलेली होती.
घटनास्थळ असलेल्या संकुल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात संशयित कैलाश शिंगाणे हा मयत प्रकाश चौधरी याच्यासोबत असल्याचे आढळून आले. त्यामुळे कैलाश शिंगाणे याच्यावर पोलिसांचा संशय अजूनच बळावला. खबऱ्यामार्फत तपास केला असता संशयित कैलास शिंगाणे हा चोपड्याच्या दिशेने गेला असल्याची माहिती पोलिसांना समजली. स.पो.नि. राकेशसिंग परदेशी यांनी आपले कौशल्य वापरत संशयित कैलास शिंगाणे याचे घर गाठून त्याच्या पत्नीला चौकशीकामी ताब्यात घेतले. कैलास शिंगाणे याच्या पत्नीच्या माध्यमातून त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्यात आला. त्याच्या पत्नीने त्याला फोन लावत तो कुठे आहे याची माहिती घेतली. पत्नीचा फोन असल्यामुळे साहजीकच कैलासने तो फोन उचलला. पत्नीने विचारलेल्या माहितीनुसार त्याने आपण चोपडा येथे असल्याचे सांगीतले.
संशयीत कैलास शिंगाणे चोपडा येथे असल्याचे समजताच पोलिस पथकाने विनाविलंब चोपडा गाठले. संशयित शिंगाणे यास पोलिस आपल्या मागावर असल्याचा संशय आला. त्यामुळे तो तेथून पसार होण्याच्या बेतात असतांनाच पोलिस अंमलदार सुनील हटकर व कॉन्स्टेबल मिलिंद भामरे यांनी त्याला शिताफीने ताब्यात घेत अमळनेर पोलिस स्टेशनला आणले. त्याला अटक करण्यात आली. संशयीत आरोपीच्या रुपात कैलास शिंगाणे यास अमळनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस कोठडीत असतांना कैलासने आपला गुन्हा कबुल केला. पैशांच्या व्यवहारातून मयत प्रकाशा चौधरी आपल्यासोबत वाद घालत होता. त्या वादातून तो आपल्या केबल कनेक्शनच्या वायरी वारंवार तोडून टाकत होता. त्यामुळे मद्याच्या नशेत त्याच्याकडून सत्य वदवून घेतल्यानंतर आपली खात्री झाली व संतापात त्याची हत्या केल्याचे कैलासने पोलिस कोठडी दरम्यान कबुल केले. कैलास शिंगाणे सध्या न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्यांना स.पो.नि. राकेशसिंग परदेशी, अंमलदार सुनिल हटकर, हे.कॉ. किशोर पाटील, प्रमोद पाटील, पोलिस नाईक मिलींद ब्राम्हणे आदींचे सहकार्य लाभत आहे.