जळगाव – बिल्डींग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय करणारे प्रविण शामराव पाटील यांची कोमल ही लहान मुलगी होती. प्रविण पाटील यांना विशाल नावाचा मुलगा व कोमल नावाची लहान मुलगी असे दोन अपत्य होते. आईबापाची एकुलती मुलगी व भाऊ विशाल याची एकुलती बहिण असलेली कोमल घरात सर्वांची लाडकी होती.
कोमल लग्नायोग्य झाल्यामुळे साहजीकच तिच्या लग्नाची चिंता प्रविण पाटील व सुवर्णा पाटील या दाम्पत्याला लागली होती. आपली मुलगी आपल्या नजरेसमोर असावी, तिचे सासर आपल्या घराजवळ असावे, अडीअडचणीत तिला भेटण्यासाठी पटकन जाता यावे या सर्व या दृष्टीकोनातून तिच्यासाठी वरसंशोधन सुरु होते. जळगाव शहरातील मेहरुण या उपनगरात प्रविण पाटील आपल्या परिवारासह रहात होते. ते रहात असलेल्या घरापासून जवळच असलेल्या रामेश्वर कॉलनी भागातील अरविंद ढाकणे यांचा मुलगा चेतन याचे स्थळ त्यांना योग्य वाटले.
प्रविण पाटील रहात असलेल्या घरापासून काही मिनीटांच्या अंतरावर असलेल्या या स्थळाची त्यांनी निवडक नातेवाईकांच्या मदतीने पाहणी केली. अरविंद ढाकणे यांचा मुलगा चेतन हा जळगाव पोलिस दलात नोकरीला होता. सरकारी नोकरी, पोलिस वर्दीचे ग्लॅमर आणि घरदार बघून प्रविण पाटील यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना चेतन ढाकणे या तरुणाचे स्थळ योग्य वाटले. आपली मुलगी सुखात रहावी हा एकच सारासार विचार करुन वधूपिता वरपक्षाच्या अपेक्षा पुर्ण करत असतो. त्याला प्रविण पाटील हे देखील अपवाद नव्हते. आजकाल नात्यापेक्षा पैशाला अवास्तव महत्व आले आहे असे म्हटले जाते व त्यात तत्थ्य असल्याचे देखील म्हटले जाते.
चेतन व कोमल यांच्या लग्नाच्या बोलणी प्रसंगी विस लाख रुपये हुंड्याची मागणी वरपक्षाकडून करण्यात आली. एवढी मागणी प्रविण पाटील यांच्यासाठी अवास्तव होती. विस लाख रुपये हुंडा ऐकून प्रविण पाटील यांच्या मनावर मोठे दडपण आले. मात्र मुलीचे भवितव्य आणि स्थळ चांगले असल्याची भावना लक्षात घेत ऐपत नसतांना त्यांनी विस लाख रुपये हुंडा देण्यास होकार दिला. लग्नाचे वेळी सात लाख आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे कबुल करत त्यांनी लग्नाची बोलणी पुढे रेटून नेली.
चेतन आणि कोमल यांचा विवाह 13 फेब्रुवारी 2016 रोजी जळगाव येथील लाडवंजारी मंगल कार्यालयात मोठ्या धुमधडाक्यात झाला. लग्नानंतर चेतन व कोमल यांच्या संसारवेलीवर दोन गोंडस फुले उमलली. दिवसामागून दिवस पुढे जात होते. कोमल व चेतन यांचा संसार सुरु होता. मात्र हुंड्याचे उर्वरित तेरा लाख रुपये देण्याची चिंता प्रविण पाटील यांना सतावत होती. तिच्या सासरकडील मंडळी तिच्या माध्यमातून प्रविण पाटील यांच्याकडे त्या तेरा लाख रुपयांसाठी तगादा लावत होते.
लॉकडाऊन व कोरोना कालावधीत रियल इस्टेटच्या व्यवसाय बराच झुकला. त्यामुळे साहजिकच बिल्डींग मटेरियलच्या व्यवसायावर देखील त्याचा परिणाम झाला होता. त्यातच कोमलच्या सासरकडील मंडळीस तेरा लाख रुपयांची पुर्तता करुन देणे बाकी होते. उधार उसनवारी करत त्यांनी जावई चेतन यास नविन घर घेण्याकामी काही महिन्यांपुर्वी दहा लाख रुपयांची पुर्तता करुन दिली. तरीदेखील तिन लाख रुपये देणे बाकीच होते.
कोमलचा पती चेतन, सासु, नणंद व नंदोई यांच्याकडून त्या तिन लाख रुपयांची मागणी सुरु असल्याबाबत ती वडील प्रविण पाटील यांच्या कानावर घालत होती. आताच काही महिन्यांपुर्वी दहा लाख दिल्यानंतर राहिलेल्या तिन लाख रुपयांची पुर्तता करणे जड असल्याचे तिच्या लक्षात येत होते. मात्र कोमल हतबल होती. मनावर दगड ठेवून ती वडीलांच्या कानावर तिन लाख रुपयांची मागणी व होणारा त्रास वडीलांच्या कानावर घालत होती. दोन मुले झाल्यानंतर आपल्या मुलीचा संसार सुरळीत होईल अशी आशा प्रविण पाटील बाळगून होते. मात्र त्या तिन लाख रुपयांसाठी तिच्या मागे सुरु असलेला तगादा तिची मानसिकता खराब करत होती.
9 सप्टेबर रोजी सकाळी नऊ वाजता कोमलचा तिचे वडील प्रविण पाटील यांना फोन आला. तिने त्यांना सांगितले की माझे पती बिल्डरला देण्यासाठी तिन लाख रुपयांची मागणी करत आहेत. तुम्ही त्यांना तिन लाख रुपये द्या नाहीतर ते मला पुन्हा त्रास देतील. तिचा रडवेला सुर ऐकून प्रविण पाटील गहिवरले. त्यांनी तिला धिर देत समजावले. तिची व तिच्या सासरच्या मंडळींची भेट घेण्याच्या निमीत्ताने गाईच्या दुधाच्या पाटोळ्या देण्यासाठी ते तिच्या घरी गेले. त्यावेळी कोमल तणावाखाली असल्याचे त्यांना जाणवले.
त्यानंतर सायकांळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना जावई चेतन याचा मोबाईलवर आलेला निरोप ऐकून एकदम धक्काच बसला. कोमलने फाशी घेतल्याचा तो निरोप होता. आम्ही तिला घेऊन दवाखान्यात जात आहोत असे देखील पलीकडून त्यांना सांगण्यात आले. आपल्या मुलीने फाशी घेतल्याचे समजताच प्रविण पाटील यांना भर पावसाळ्यात जणू काही दरदरुन घाम फुटला. त्यांनी जोरात हंबरडा फोडत घरात सर्वांना हा निरोप कथन केला. काही नातेवाईकांच्या सोबतीने त्यांनी सरकारी दवाखाना गाठला.
त्यावेळी कोमल त्यांना मयत अवस्थेत दिसून आली. तिच्या गळ्यावर फाशीचे काळसर वळ दिसून आले. हे कसे काय झाले असा प्रश्न त्यांनी जावई चेतन यास विचारला. त्यावर प्रविण पाटील यांना व्यवस्थीत माहिती मिळाली नाही. याप्रकरणी प्रविण पाटील यांनी 10 सप्टेबर रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत रितसर फिर्याद दाखल केली. हुंड्यातील तिन लाख रुपयांसाठी सासरच्या लोकांनी कोमलचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ करुन गळफासाने मृत्यू घडवून आणल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत नमुद केला. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.