जळगाव – शहरातील शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेडकर नगर परिसरात रिक्षा चालकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राजु प्रदीप सोनवणे (56) असे हत्या करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे. डोक्यात टणक वस्तूने मारहाण केल्याने राजु सोनवणे यांचा मृत्यु झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
राजु सोनवणे हे रहात असलेल्या घराजवळच त्यांची आई राहते. ते आईला भेटण्यासाठी रात्री गेले होते व तेथेच मुक्कामी होते असे सांगितले जात आहे. दरम्यान सकाळी सोनवणे यांची हत्या रात्री झाली असून सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
राजु सोनवणे यांची हत्या कुणी केली?, का केली? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत असून परिसरात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शनी पेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा मृतदेह सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनकामी नेण्यात आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शनीपेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्याचे कामकाज सुरु होते.







