नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) – अल्पवयीन मुलीस फुस लावून तिचे अपहरण केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचा-यास अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या म्हसरुळ परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. दिपक जठार असे अटक करण्यात आलेल्या संशयीत पोलिसाचे नाव असून त्याला नांदुर नाका परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध म्हसरुळ पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पीडीत मुलगी तिच्या आईवडीलांसह म्हसरुळ परिसरात राहते. रविवारी दुपारी ती घराबाहेर गेली असता रात्री उशीरापर्यंत परत आली नाही. पिडीत मुलीच्या पालकांच्या परिचयातील पोलिस कर्मचारी दिपक जठार याचेशी त्यांनी संपर्क साधला. त्याने तिच्या पालकांना म्हटले की तुम्ही काळजी करु नका मी तिचा शोध घेतो. सकाळपर्यंत मुलगी परत आली नाही म्हणून तिच्या पालकांनी म्हसरुळ पोलिसात रितसर तक्रार दिली.
वरिष्ठ निरिक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. मात्र मुलीचा मोबाईल बंद असल्यामुळे तिचे लोकेशन समजत नव्हते.
तिच्या वडीलांनी पुन्हा पोलिस कर्मचारी दिपक जठार याचेशी संपर्क साधला. त्यावेळी पुन्हा त्याने तुम्ही काळजी करु नका मी शोध घेतो असे म्हटले. त्याच्या बोलण्याचा मुलीच्या वडीलांना संशय आला. त्यांनी हा प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिस पथकाने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याचा मोबाईल देखील बंद आला. अखेर शेवटच्या कॉलच्या आधारे तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढण्यात आला. तपास करत करत त्याला नांदूर नाका येथे कार (एमएच 15 ईडब्ल्यु 9990) सह पकडण्यात आले. त्या कारमधे त्याने मुलीला ठेवले होते. मुलीची कारमधून बाहेर काढत सुटका करण्यात आली.
पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारतकुमार सुर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील संशयित पोलिस कर्मचारी दिपक जठार हा पूर्वी गुन्हे शाखा युनिट एक मध्ये कार्यरत होता. त्याची बदली मोटार वाहन विभागात व त्यानंतर उपनगर पोलिस स्टेशनला झाली. तो रजेवर असतांना रजा कालावधीत त्याने हा अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे अपहरण केले. त्याच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







