डॉक्टरांनी केले रक्तदान – मातेसह बाळाचे वाचले प्राण

On: September 14, 2021 12:06 PM

जळगाव/पाचोरा – अत्यवस्थ गरोदर मातेसह बाळाचे प्राण वाचवणा-या पाचोरा येथील डॉ. सुर्यवंशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. लिलावती हॉस्पीटलचे डॉ. वैभव सुर्यवंशी यांच्यासह त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले जात आहे.

पाचोरा तालुक्यातील शहापुरे येथील सौ. स्विटी अविनाश खरे ही गरोदर माता अत्यवस्थ झाली होती. या गरोदर मातेची अवस्था गंभीर होती. रक्ताचे प्रमाण केवळ चार टक्के व प्लेटलेट्स अवघ्या सतरा हजार एवढ्या होत्या. अशा अवस्थेत तिला पाचोरा येथील काही डॉक्टरांनी जळगावला नेण्याचा सल्ला दिला. अशा अवस्थेत काय करावे हे रुग्ण महिलेचे सासरे व नातेवाईकांना समजत नव्हते. रात्र बरीच झालेली होती. अशा वेळी खरे यांचे शहरातील नातेवाईक अरुण ब्राह्मणे मदतीला धावून आले. त्यांनी हा प्रकार नंदु सोमवंशी यांच्यासह कॉंग्रेस पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना सांगितला. सचिन सोमवंशी यांनी तात्काळ लिलावती हॉस्पिटलचे डॉ. वैभव सुर्यवंशी यांना विंनती करुन रुग्णाला दाखल करुन घेण्यास सांगितले. रुग्णाच्या जीवाचे काही झाल्यास त्याला नातेवाईक जबाबदार राहतील असे लिहून देण्यात आले.

रुग्ण व रुग्णाच्या बाळाचे प्राण वाचवण्याचे आव्हान डॉ. सुर्यवंशी यांनी पेलले. रुग्ण महिलेचा रक्तगट दुर्मिळ असा एबी पॉझीटीव्ह होता. योगायोगाने हा रक्तगट डॉ. सुर्यवंशी यांचा देखील होता. त्यामुळे त्यांनी विनाविलंब स्वत:चे रक्त रुग्णाला दिले. त्यातच रुग्ण महिलेची प्रसुतीची वेळ समीप आली होती. अथक प्रयत्नांती बाळ व बाळंतीन दोघांचे प्राण वाचवण्यात डॉ. सुर्यवंशी व त्यांच्य पथकाला यश आले. प्रसुती सुखरुप झाली. लिलावती हॉस्पिटलचे संचालक डॉ. वैभव सुर्यवंशी यांच्यासह डॉ. मनोहर शिंपी, सुनिता पाटील, सोनी पाटील, निलेश ब्राह्मणे यांच्यासह नातेवाईक अरुण ब्राम्हणे, नंदू सोमवंशी, पाचोरा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केलेली मदत मोलाची ठरली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment