जळगाव (क्राईम दुनीया न्युज नेटवर्क) : घरमालकासह इतर सदस्य वरच्या मजल्यावर झोपले असतांना खालच्या घरात चोरट्यांनी आपली हातसफाई दाखवत 68 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. सरफराज खान अयुब खान पठाण (पंचशील नगर तांबापुरा फुकटपुरा जळगाव) यांच्या घरात सदर चोरी झाली असून त्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरफराज खान यांचे दुमजली घर असून 13 सप्टेबरच्या रात्री बारा वाजेच्या सुमारास ते घरातील सदस्यांसह वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी तळमजल्यावरील घराला कुलूप लावले होते. मध्यरात्री सर्व जण गाढ झोपेत असतांना त्यांच्या खालच्या घराच्या दरवाजाच्या कडीकोंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. तत्पुर्वी त्यांनी वरच्या घरातील दरवाजाला बाहेरुन कडी लावून घेतली होती. परिसरातील लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पठाण यांच्या वरच्या मजल्यावरील दरवाजाची कडी उघडून त्यांना बाहेर काढले. खाली आल्यावर घरातील सामान त्यांना अस्ताव्यस्त झालेले दिसून आले.
खालच्या घरात पाहणी केली असता पॅंटच्या खिशातील साडेचार हजार रुपये रोख, 60 हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत, अडीच हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट, एक हजार रुपये किमतीची चांदीची चेन, असा एकुण 68 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स व पॅन कार्ड देखील चोरट्यांनी नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळी डॉग स्कॉड व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले. आरोपींच्या शोधार्थ पो.नि. शिकारे यांच्या गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद, सुधीर साळवे, मुदस्सर काझी व गोविंदा पाटील आदी पुढील तपास करत आहेत.