औरंगाबाद : पत्नीला नोकरी लावण्याचा बहाणा करत चक्क सास-याकडून दहा लाख रुपये उकळण्याचा प्रकार उघड झाला आहे. या पती महोदयाचा प्रताप एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बनावट नियुक्तीपत्र देखील तयार करुन आणले. केलेला बनाव उघडकीस आल्यानंतर त्याने पत्नीला जिवे मारण्याची धमकी देखील दिली.
19 मार्च ते 14 सप्टेबर दरम्यान झालेल्या या घटनेबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती रोहीत जगन्नाथ पोतराजे (29), सासू सुमित्रा पोतराजे, चुलत सासू चंद्रकला छगन पोतराजे, दीर राहुल पोतराजे (सर्व रा. संग्रामनगर, जालना) यांच्याविरुद्ध फसवणूकीसह कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बी. ई. सिव्हिलपर्यंत शिक्षण झालेली विवाहीता अंबड येथील शासकीय तंत्र निकेतनमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत होती. वधू-वर परिचय मंडळाच्या माध्यमातून तिच्या आई-वडिलांची सुमित्रा पोतराजे हिच्यासोबत परिचय झाला. त्या माध्यमातून रोहितच्या लग्नाचा प्रस्ताव देण्यात आला. बोलणी दरम्यान मुलीला नोकरी लावून द्यावी लागेल अशी अट वर पक्षाकडून घालण्यात आली.
आम्हाला दहा लाख रुपये द्या, आम्हीच नोकरी लावून देतो असे रोहीतच्या बाजूने वधू पक्षाला सांगण्यात आले. उपवधूच्या वडीलांनी दीड लाख रुपये राहुलच्या खात्यावर जमा केले व लग्नानंतर राहिलेली रक्कम देखील दिली. काही दिवसांनी पतीने तिला एका इंजिनिअिरंग कॉलेजचे बनावट नियुक्तीपत्र आणून दिले. मात्र ते बनावट असल्याचे लक्षात आले.