औरंगाबाद – विवाहित महिलेसोबत असलेल्या मैत्रीचा फायदा घेत तिचे खासगी फोटो काढून तिला दाम्पत्याने ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पैसे दिले नाही तर ते खासगी फोटो समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दाम्पत्याने विवाहितेला दिली. याप्रकरणी अमित किशनलाल सिंदवाणी (रा. अथर्व सोसायटी औरंगाबाद) व त्याची पत्नी अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलूनचा व्यवसाय करणारी 32 वर्षाची पिडीत विवाहिता घरपोच सेवा देते. अमितच्या आईने तिला फेशीयल करण्याच्या निमित्ताने घरी बोलावले होते. अधूनमधून ती अमितच्या घरी येऊन त्याच्या आईचे फेशीयल करुन देत होती. त्या माध्यमातून तिची अमितसोबत ओळख झाली होती.
गेल्या दिड वर्षाच्या कालावधीत ओळखीच्या माध्यमातून अमितने तिचे काही खासगी फोटो काढले होते. त्यावेळी पिडीत विवाहीतेने कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र नंतर त्या फोटोच्या आधारे अमितने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तु पतीपासून वेगळी हो, हातावर माझे नाव गोंदून घे अशी मागणी तो तिच्याकडे करु लागला.
त्याच्या त्रासाला वैतागून तिने त्याच्यासोबत संपर्क तोडला. त्यामुळे अमितला तिचा राग आला. काढलेले फोटो नातेवाईकांना पाठवतो नाहीतर तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत कर असे तो तिला म्हणू लागला. तिने हा प्रकार तिच्या पतीला कथन केला. तिच्या पतीने त्याच्या भावाच्या मोबाईलवर 33 हजार रुपये पाठवून देखील त्याचा त्रास सुरुच होता. अखेर अमित व त्याच्या पत्नीविरुद्ध पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.