पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार पित्यास दहा वर्षांचा सश्रम कारावास

On: July 18, 2020 6:21 PM

पांढरकवडा (यवतमाळ) : आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला येथील न्यायालयाने दहा वर्षांचा सश्रम कारावास तसेच एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. 

वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील रहिवासी इसमाने घरात टिव्ही पहात असलेल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला होता. तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. 

घराबाहेर जाताना तो पीडित मुलीला घरात डांबून ठेवत होता. सदर प्रकार पीडितेचा भाऊ व मावशीला समजला. १४ जुलै २०१६ रोजी तिने भाऊ व मावशीला सोबत घेत पांढरकवडा पोलीस स्टेशन गाठले.

तिच्या तक्रारीवरून नराधम पित्याविरूद्ध भादंवि ३७६, ३७६ एफजेके, ३४२, ५०६, बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम ४, ६, १२ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा ६६-ई, ६७-ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासात आरोपीविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाला. पांढरकवडाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी पांढरकवडा सत्र न्यायालयात चार्ज शिट दाखल केले.खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.अजय गोते यांनी ११ साक्षीदार तपासले.

त्यात अल्पवयीन पीडित मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली. घटनास्थळावरील प्रत्यक्ष साक्षीदारांचीही साक्ष देखील महत्वाची ठरली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्या. पी.बी.नाईकवाड यांनी ग्राह्य धरला.

आरोपीला पीडित मुलीवर बलात्कार केल्याबाबत दहा वर्षांचा सश्रम कारावास, एक हजार रूपये दंड व पीडितेस घरात डांबून ठेवल्याच्या आरोपाखाली एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी जमादार संतोष राऊत यांनी काम पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment