जळगाव – जळगाव शहरातील तांबापुरा फुकटपुरा भागातील रहिवासी सरफराज खान अयुबखान पठाण यांच्या घरात गेल्या 13 सप्टेबर रोजी चोरी झाली होती. या घटनेत दुमजली घरमालक पठाण हे रात्रीच्या वेळी खालच्या मजल्याच्या मुख्य खोलीस कुलूप लावून वरच्या मजल्यावरील खोलीत परिवारासह झोपण्यास गेले होते. एकुण 68 हजार रुपयांचा मुद्देमाल व कागदपत्रांची चोरी सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तपासात यापुर्वी मेहरुण परिसरातील जंगलातून अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातून 61 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचा साथीदार शेख फारुख उर्फ सोनू सलीम शेख रा. फुकटपुरा तांबापुरा हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो शाहुनगर भागात आला असल्याची माहिती पोलिस पथकाला समजली. पथकाने झडप घालून त्याला ताब्यात घेत अटक केली.
अटकेतील आरोपी शेख फारुख यास उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याने यापुर्वी अडावद पोलिस स्टेशन हद्दीत चोरीचा गुन्हा केला आहे. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांचे सहकारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक इमरान खान, सुधीर साळवे, सचिन पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील यांनी या तपासकामी सहभाग घेतला.
दुस-या घटनेत यापुर्वी 12 जुलै रोजी सेवानिवृत्त शिक्षक मोहम्मद युनुस कालू खान यांच्या गणेशपुरी मेहरुण येथील घरी घरफोडी झाली होती. या घटनेत एकुण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या गुन्ह्याच्या तपासात यापुर्वी मोहनसिंग बावरी रा. शिरसोली नाका शिकलकर वाडा तांबापुरा जळगाव आणि फरीद उर्फ गुल्ली मोहम्मद मुलतानी रा. अजमेरी गल्ली तांबापुरा जळगाव या दोघांना अटक करण्यात आली होती. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते.
सदर घटना घडल्यापासून या गुन्ह्यातील अटकेतील आरोपींचा साथीदार अनिस हमिद शेख (पटेल) राम नगर शिरसोली नाका जळगाव हा फरार होता. त्याल देखील शिताफीने अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी सहायक फौजदार अतुल वंजारी, मुदस्सर काझी, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंडे यांनी सहभाग घेतला. उद्या त्याला देखील न्यायालयात हजर केले जाणार आहे.