नाशिक – नाशिक शहर पोलिस आयुक्त दिपक पांडेय अनधिकृत होर्डींग्ज विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बेकायदा होर्डींग्जवर ज्या कुणाचे छायाचित्र असेल व ज्यांनी ते लावले असेल अशा सर्वांना किमान चार व कमाल एक वर्षासाठी कारागृहात मुक्कामी जाण्याची कायद्यात तरतुद असल्याचे पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांनी स्पष्ट केले आहे. श्रींचे विसर्जन झाल्यानंतर याबाबत कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.
जून 2003 च्या नगरविकास विभागाच्या अधिसूचनेप्रमाणे जाहिरातीच्या माध्यमातून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होण्याची शक्यता गृहीत धरुन होर्डींग्ज लावण्यासाठी परवानगी दिली जाणार नसल्याचे म्हटले आहे. केंद्रीय पोलिस अधिनियम 1959 चे कलम 37 (1) (च) नुसार सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी अधिकार पोलिस आयुक्तांना आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन होर्डींग्जच्या माध्य्मातून जाहीरातबाजी करण्यास पोलिस आयुक्त मनाई आदेश देऊ शकतात.
नगर विकास विभागाच्या जून 2003 च्या अधिसुचनेला अनुसरुन मनपा शासकीय तसेच खासगी जागेवर जाहीरात होर्डींग्जला परवानगी देण्यास पात्र असली तरी जनतेच्या सभ्यता व नितीमत्ता लक्षात घेता जाहीरातीचा मजकुर पोलिस आयुक्तांच्या माध्यमातून मनपाने प्रमाणीत करणे बंधनकारक असेल.