जळगाव – स्वभावाला औषध नसते असे म्हटले जाते. संशयी स्वभाव असल्यास तो स्वत:ला आणि दुस-याला देखील त्रासदायक ठरत असतो. पत्नीवरच जर पती चारित्र्याचा संशय घेत असेल तर त्याची परिणीती कधीतरी घातक होत असते. संशयी स्वभाव असलेल्या व्यक्तीला कुणी कितीही समजावून सांगितले तरी तो त्याचा संशयी स्वभाव सोडत नाही.तो आपलीच जिद्द पुर्ण करण्याच्या नादात असतो. अखेर त्याला एके दिवशी त्याचे फळ भोगावे लागते. मात्र त्याच्यासोबत त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे संशयी आणि हेकेखोर व्यक्तीपासून चार हात लांब राहणेच योग्य ठरते.
प्रेमसिंग अभयसिंग राठोड हा एक कष्टकरी मजुर होता. मुळचा मध्यप्रदेशातील बुरहानपुर जिल्ह्यातील रहिवासी असलेला प्रेमसिंग हा चरितार्थासाठी जळगाव शहरात वास्तव्याला आला होता. पत्नी बसंतीसह तो जळगाव शहरात आल्यानंतर मोलमजुरी करु लागला. प्रेमसिंग व बसंती या दोघांचा संसार व्यवस्थित सुरु होता. पत्नी बसंतीपासून त्याला दोन मुले व दोन मुली असे चार अपत्य झाले.
लग्नानंतर काही दिवसातच प्रेमसिंगचा मुळ संशयी स्वभाव प्रकट झाला. तो पत्नी बसंतीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यावेळी त्यांची मुले लहान होती. त्यामुळे सुरुवातीला बंसतीचे नातेवाईक प्रेमसिंगची समजूत घालत होते. बसंतीच्या बाबतीत संशय घेऊ नये असे त्याला समजावले जात होते. मात्र काही दिवस चांगले गेल्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे प्रेमसिंगचा संशयी स्वभाव उफाळून येत होता. तो बसंतीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे काम काही सोडत नव्हता.
कालांतराने दोघांची मुले मोठी व कमावती झाली. मुले मोठी झाल्यानंतर आता तरी प्रेमसिंगने बसंतीवर संशय घेण्याचे काम सोडून द्यायला हवे होते. मात्र त्याचा संशयी स्वभाव काही गेलाच नाही. मोलमजुरी करणा-या मुलांसमोरच तो पत्नी बसंतीसोबत चारित्र्याच्या संशयावरुन वाद घालत होता. मुले मोठी झाल्यानंतर प्रेमसिंगचे असले वागणे बसंतीला व तिच्या मुलांना व मुलींना देखील अवघडल्यासारखे वाटत होते. मात्र कुणाचाच काही त्याच्यापुढे ईलाज चालत नव्हता. सर्वजण त्याला सहन करत होते.
प्रेमसिंग राठोड, त्याची पत्नी बसंती, मुले दीपक व गोपाळ मुली कविता व शिवाणी असे सर्वजण गेल्या दोन वर्षांपासून जळगाव शहरातील निमखेडी रस्त्यावरील लता राजेंद्र लुंकड यांच्या घरात भाड्याने रहात आहेत. ते रहात असलेल्या घरासमोरील शेडमध्ये विशाल राजेंद्र चोपडा यांच्या मालकीची गुरे राखण्याचे काम राठोड परिवार करत होता. गोपाळ व दीपक हि दोन्ही मुले मजुरी करण्यासाठी देखील जात होते. एकंदरीत सर्व परिवार मोलमजुरी करुन संसाराचा गाडा ओढत होते.
प्रेमसिंगच्या कानाची शस्त्रक्रिया करायची होती. त्यामुळे 12 सप्टेबर रविवारच्या दिवशी दीपक व गोपाळ या दोन्ही मुलांनी प्रेमसिंग यास सरकारी दवाखान्यात नेण्याचे नियोजन केले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर बुरहानपुर येथे देखील नेण्याचे नियोजन दोघा मुलांनी केले. मात्र आपल्यासोबत बसंतीने देखील यावे या हट्टाला प्रेमसिंग पेटून उठला. त्याचे कारण म्हणजे त्याच्या मनात तिच्या चारित्र्याचा संशय होता. आपल्या पश्चात बसंतीचे वागणे कसे असेल याबाबत तो बरळू लागला. त्याच्या अशा बोलण्याचा दोघा मुलांना राग आला. दोघा मुलांच्या रागाचा पारा चढला. त्यात बसंतीने मध्यस्ती करत दोघा मुलांना व पती प्रेमसिंग यांना समजावण्यास सुरुवात केली. मात्र प्रेमसिंग समजून घेण्यास तयार नव्हता. शब्दामागे शब्द वाढत होता. दवाखान्यात जाण्याचे नियोजन या वादात कोलमडले.
आपल्या आईवर आपलाच बाप चारित्र्याचा संशय घेत असल्याचे बघून संतापाच्या भरात दोघा मुलांनी बाप प्रेमसिंग यास मारहाण सुरु केली. बघता बघता पिता पुत्रातच झटापट सुरु झाली. प्रेमसिंगने घरातून चाकू आणून गोपाळवर वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गोपाळने शिताफीने तो चाकू हिसकावून घेतला. त्यामुळे प्रेमसिंगने गोपाळला काठीने मारहाण करण्याचा प्रयत्न सुरु केला. वाद वाढतच गेला. त्यामुळे संतप्त गोपाळने थेट बाप प्रेमसिंगच्या पोटावर, छातीवर आणि पायावर त्याच चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. दरम्यान संतापलेल्या दुसरा भाऊ दीपकने देखील प्रेमसिंग यास काठीने मारहाण सुरु केली. या घटनेत रक्तबंबाळ झालेला प्रेमसिंग अंगणातून थेट रस्त्यावर पळत सुटला. त्याच्यापाठोपाठ दोन्ही मुले देखील रस्त्यावर पळू लागले. दोन्ही मुले प्रेमसिंग यास मारहाण करत होते.
भर रस्त्यावर प्राणघातक हल्ल्याची जिवघेणी घटना घडत असतांना जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी श्याम बोरसे हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलने ड्यूटीवर जात होते. बंसती व तिची मुलगी जोरजोरात रडत असल्याचे व प्रेमसिंग यास दोन्ही मुले मारहाण करत असल्याचे भयावह दृश्य त्यांनी पाहिले. ती घटना व घटनेतील सर्वच जण त्यांच्यासाठी अनोळखी होते. चाकूचे वार प्रेमसिंगवर होत असल्याचे बघून पोलिस कर्मचारी शाम बोरसे यांनी आपली मोटारसायकल बाजुला उभी केली.
सुदैवाने बोरसे यांच्याजवळ आरोपींच्या हातात घालण्याच्या बेड्या देखील होत्या. पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी दोघा मारेकरी मुलांना ताब्यात घेत त्यांच्या हातात बेड्या घातल्या. त्यानंतर लागलीच पोलिस स्टेशनला संपर्क साधून मदत मागीतली व कर्मचारी वाहनासह बोलावून घेतले. काही वेळातच पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोपाळ व दीपक या दोघांना ताब्यात घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. दरम्यान प्रेमसिंग याने आपले प्राण सोडले होते. घटनास्थळी प्रेमसिंगचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
पोलिस पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केल्या. ज्या दवाखान्यात कानाची शस्त्रक्रिया करण्यासाठी जायचे होते त्या दवाखान्यात त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. मयत प्रेमसिंग याचा भाऊ रोहिदास अभयसिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस स्टेशनला गोपाळ व दीपक या दोघा भावांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिपक व गोपाळ या दोन्ही भावांना अटक करण्यात आली असून पुढील तपास जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.