जळगाव – जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बिकट झाली आहे. शेवटची घटका मोजणा-या जळगाव शहरातील रस्त्यांची दुरुस्ती होण्याच्या आश्वासनावर सध्याचे आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभा निवडणूक जिंकली. मात्र रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस जास्तच खालावली आहे. रस्ते दुरुस्तीचे आश्वासन देणा-या आमदारांची प्रगती झाली मात्र रस्त्यांची अधोगती झाली आहे.
या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उभारणीसाठी किडणी विकण्यास तयार असल्याबाबतचे निवेदन सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी आपल्या सहकारी मित्रांसह महानगरपालिका व जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव, उप सचिव, कक्ष अधिकारी आणि विभागिय आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
किडनी विकून जमा झालेल्या रकमेतून जळगाव शहराचे रस्ते तयार व्हावे मात्र त्यात भ्रष्टाचार होता कामा नये असे देखील दिपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे. सदर निवेदन अतिरीक्त आयुक्त विद्या गायकवाड यांनी स्विकारले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांना देखील सदर निवेदन देण्यात आले. या निवेदनावर प्रेमल पाटील, मतिन पटेल, चैतन्य कोल्हे, मंदार कोल्हे, संजय पाटील, सिद्धार्थ सोनाळकर, अमोल कोल्हे, कॉ. अनिल नाटेकर, सुरेश पांडे, शिवराम पाटील, किरण ठाकुर, ललीत शर्मा, युसुफ पिंजारी आदींच्या सह्या आहेत.