जळगाव, दि. 20 (प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्त गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा ‘आज गांधी आठवतांना…!’ या विषयावर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजले आहे. ‘ जोपर्यंत श्रीमंत-गरीबांना आवश्यक एवढे स्वदेशी वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी केवळ पंचा नेसेल या’…राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिज्ञेला 22 सप्टेंबर 2021 रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या औचित्याने हा विशेष कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.
देशातील गोर-गरीब जनतेला नेसायला पुरेसे वस्त्र ही मिळत नाही व आपण मात्र पूर्ण वस्त्रानिशी वावरतो. याबाबीचे गांधीजींना खूप वैशम्य वाटत असे. त्यांचे संवेदनशील मन व्यथित झाले.‘जोपर्यंत गोर-गरीबांना आवश्यक तेवढे वस्त्र मिळत नाही तोपर्यंत फक्त पंचा नेसेल व इतर वस्त्रांचा त्याग करीन…’ ही प्रतिज्ञा त्यांनी 22 सप्टेंबर 1921 रोजी मदुराई येथे केली. त्या दिवसापासून गांधीजी आजीवन फक्त पंचा नेसून राहिले. महात्मा गांधीजींच्या अनुयायांनी देखील जास्त वस्त्र संग्रह न करता गरजेपुरते वस्त्र वापरण्याचा संकल्प घेतला. गांधीजींच्या या कृतीची प्रेरणा इतरांना देखील मिळाली व इतरांनी देखील कमीतकमी वस्त्र वापरण्यास सुरूवात केली.
महात्मा गांधींच्या या वस्त्र त्यागाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने व ‘त्याग करण्यात नेहमीच स्वात्विक आनंद प्राप्त होतो’ या गांधीजींच्या वचनाचे स्मरण करुन आपल्यातील वाईट सवयी, व्यसन यांचा त्याग करण्याचा संकल्प करण्यासाठी गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. बुधवार 22 सप्टेंबर 2021 ला दुपारी चार वाजता ऑनलाईन स्वरुपात होणाऱ्या या कार्यक्रमात फेसबुक https://www.facebook.com/gandhiteerth/ व युट्यूब लिंकद्वारे, https://www.youtube.com/c/GandhiTeerth सर्वांना सहभागी होता येईल. व्याख्यानानंतर या विषयावर प्रश्नोंत्तरे ही होतील. जास्तीत जास्त संख्येने खालील लिंकवर क्लिक करुन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव द्वारा केले आहे.