जळगाव – वाळू उपसा व वाहतुकीला बंदी असतांना जळगाव शहरात अनेक ठिकाणी वाळू वाहतुक सुरु असल्याचे दिसून येते. शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध वाळू वाहतुक करणा-या चालक व मालक अशा दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना वाळू वाहतुक करणा-या ट्रॅक्टर चालक संदिप गोकुळ बाविस्कर व मालक आत्माराम सोनवणे या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. हरिषकुमार नारायण डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
स.पो.नि. संदिप परदेशी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आज सकाळी पो.कॉ. निलेश बच्छाव आणि हरिषकुमार डोईफोडे या कर्मचा-यांसह विद्युत कॉलनीनजीक अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रॉलीसह ट्रॅक्टर अडवले. संदीप बाविस्कर या ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना वा कागदपत्रे आढळून आली नाही. याप्रकरणी सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता याच्या आदेशाने व पो.नि. विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूने भरलेले ट्रॉलीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून दोघांवर भा.द.वि. 379, 34 प्रमाणे रितसर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ.दीपक शिरसाठ करत आहेत. ट्रॅक्टर मालक फरार असून त्याचा शोध सुरु आहे.