जळगाव – जळगाव शहरात आज सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी तिघा जणांना अटकक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपुर्वी झालेल्या खूनाच्या घटनेचा आजच्या गोळीबाराच्या घटनेशी संबंध असल्याचे दिसून येत आहे. विक्की अलोनी, सोनू सपकाळे व बाबू सपकाळे अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी माध्यमांसोबत बोलतांना सदर माहिती दिली आहे.
आज सकाळी कांचन नगर भागातील रहिवासी आकाश सपकाळे, नितीन सपकाळे, त्यांचे वडील मुरलीधर सपकाळे व नितीन सपकाळे यांची पत्नी असे चौघे जण घरात होते. त्यावेळी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चौघांनी आत प्रवेश केला. त्यातील एकाने आकाशवर गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेत आकाश व विक्की असे दोघे जखमी झाले.
पिस्टल राऊंड व मोबाईल तसेच रक्ताचे डाग घटनास्थळी मिळून आले आहेत. आकाश व विक्की असे जखमी झाले असून दोघेही सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचार घेणारा विक्की अलोनी याच्यासह सोनू सपकाळे व बाबू सपकाळे पोलिसांच्या ताब्यात आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.
गेल्या काही महिन्यांपुर्वी एक खूनाची घटना घडली होती. त्या घटनेत आकाश हा संशयीत आरोपी आहे. त्याचा काही महिन्यांपुर्वी जामीन झालेला असून तो जामीनावर बाहेर आहे. त्या घटनेच्या पार्श्वभुमीवर आजची गोळीबाराची घटना झाली असल्याचे प्राथमीक तपासात दिसून आले आहे.