जळगाव : वयाच्या सतराव्या वर्षापासून गुन्हेगारीच्या पाठशाळेत जाणा-या पुतण्याने आपल्याच काकाच्या घरात चोरी केल्याचे उघड झाले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने लावलेल्या तपासात या पुतण्याचे प्रताप उघड झाले असून त्याच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बंटी उर्फ नाट्या जितेंद्र चौधरी असे पारोळा शहरातील या गुन्हेगाराचे नाव आहे. अवघ्या चोवीस तासात या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली असून त्याला पुढील तपासकामी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पारोळा येथील रहिवासी असलेले भागवत सुकलाल चौधरी हे त्यांच्या मुलाकडे मुंबई येथे गेले होते. त्यांचे बंद असलेल्या घराच्या छताचे गज वाकवून चोरट्याने घरात प्रवेश करत चोरी केली होती. या प्रकरणी भागवत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलिस स्टेशनला 22 सप्टेबर रोजी गु.र.न. 367/21 भा.द.वि. 454, 457, 380 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या समांतर तपासात एलसीबीने आघाडी घेतली. पो.नि. किरणकुमार बकाले यांनी तयार केलेल्या पथकातील सहायक फौजदार अशोक महाजन, पोलीस हवालदार सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, दिपक पाटील, पो.ना. नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, राहुल बैसाणे, पोकॉ सचिन महाजन, चालक अशोक पाटील, भरत पाटील, विजय चौधरी यांनी पारोळा गाठले.
पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी या गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास केला. या गुन्ह्यातील फिर्यादी भागवत चौधरी यांचा पुतण्या बंटी उर्फ नाट्या जितेंद्र चौधरी हा वयाच्या सतराव्या वर्षापासून गुन्हेगारी क्षेत्रात आघाडीवर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशयाची सुई त्याच्यावर स्थिर ठेवत त्यांनी तपास पथकाला योग्य ते मार्गदर्शन केले. फिर्यादी रहात असलेल्या गल्लीतच राहणारा फिर्यादीचा संशयीत पुतण्या बंटी उर्फ नाट्या याला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत व पोलिसी खाक्या बघून त्याने आपला गुन्हा कबुल केला. काकाच्या लहान मुलाचे अर्थात बंटीच्या चुलत भावाचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे त्यांच्या घरात सोने व रोख रक्कम असेल याची त्याला खात्री वाटली. त्या सोन्यासह रोख रकमेची चोरी केल्यास त्यातून आपण हॉटेल सुरु करु असा त्याने विचार केला होता. या चोरीच्या घटनेत त्याने चोरी केलेली रोख रक्कम त्याने पोलिसांना काढून दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चोवीस तासात या चोरीच्या गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.