जळगाव : रात्रगस्ती दरम्यान संशयास्पदरित्या फिरणा-या गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध रितसर कारवाई केली आहे. सोनुसिग उर्फ सोन्या रमेश राठोड असे त्याचे नाव असून पोलिसांच्या अभिलेख्यावर त्याचा गुन्हेगारी इतिहास लिखीत आहे.
24 सप्टेबर रोजी सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. गफुर तडवी, पो.कॉ. साईनाथ मुंढे, पो.कॉ. नरसिंग पाडवी असे सर्व जण रात्रगस्तीवर कार्यरत होते. दरम्यान रात्री साडेबारा वाजता आरएल चौफुलीजवळ एका कंपनीच्या भिंतीजवळ आडोशाचा फायदा घेत आपला चेहरा लपवत असलेला एक तरुण त्यांना दिसून आला. पोलिस पथकाला बघून तो पळू लागला. त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव सोनुसिंग उर्फ सोन्या रमेश राठोड असे नाव कथन केले.
पोलिसांच्या ताब्यातील सोनुसिंग हा पोलिसांच्या अभिलेख्यावरील कुविख्यात असल्याचे दिसून आले. गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने तो फिरत असल्याची खाती झाल्याने व तो संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध पो.कॉ. सतिष गर्जे यांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 (ब) व (ड) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.