औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापुर तालुक्यातील खंबाळा शिवारात चोरीच्या उद्देशाने घरात घुसून एकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील फरार आरोपीस औरंगाबाद स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली आहे. मायकल शिवराम चव्हाण (21) लक्ष्मीनगर ता. कोपरगाव जि.अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या तपास पथकाला जळगाव येथूनच घरफोडीतील आरोपी देखील गवसला. अशा प्रकारे खूनासह दरोड्याच्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना औरंगाबाद स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातून दोघा आरोपींना पकडून औरंगाबाद येथे नेले. दोघे आरोपी कोपरगाव तालुक्यातील आहेत.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी खंबाळा फाटा येथील रहिवासी राजेंद्र जिजाराम गोरसे या तरुणाची हत्या करण्यात आली होती. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या तिघांनी राजेंद्र गोरसे याची हत्या तर त्याची पत्नी मोनिका हिस जबर जखमी केले होते.
गुन्हा घडल्यानंतर निष्पन्न झालेले देवा उर्फ काळ्या जैनू काळे व शाईराम उर्फ साईराम उर्फ सा-या जैनू काळे या दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांचा तिसरा साथीदार मायकल फरार होता. त्याला जळगाव येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत दरोड्याच्या एका गुन्ह्यातील आरोपी देखील तपास पथकाच्या हाती लागला. राहुल दामू भोसले (जेऊर पाटोदा ता. कोपरगाव) असे त्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, अंमलदार सुनील खरात, पाथ्रीकर, वाल्मीक निकम, ज्ञानेश्वर मेटे, पगारे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.