जळगाव – टॅंकरला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याच्या प्रयत्नात अॅक्टीव्हा चालक महिलेचा तोल गेल्याने झालेल्या अपघातात दोघे मायलेक जागीच ठार झाले तर चालक महिला जखमी झाल्याची घटना आज घडली. अपघातग्रस्त टॅंकर नजीकच्या जळगाव तालुका पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. चारुशिला राहुल पाटील व त्यांचा मुलगा निशांत राहुल पाटील असे मयत झालेल्या दोघा मायलेकांची नावे आहेत. रुपाली पाटील असे जखमी अॅक्टीव्हा चालक महिलेचे नाव आहे.
रुपाली पाटील या अॅक्टीव्हा चालक महिलेच्या मागे त्यांची बहिण चारुशिला पाटील व त्यांचा बारा वर्षाचा मुलगा निशांत असे तिघे जण एरंडोल येथून जळगावच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान बांभोरी नजिक पुढे धावणा-या टॅंकरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न रुपाली पाटील यांनी केला. या प्रयत्नात त्यांचा तोल जावून पडल्याने दोघे मायलेक टॅंकरच्या मागच्या चाकात आले. त्यात दोघे मायलेक जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच पाळधी दुरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा व त्यांचे सहकारी हे.कॉ. संजय महाजन व पो.कॉ. चंद्रकांत चंदनकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतुक सुरळीत करुन त्यांनी टॅंकर नजीकच्या जळगाव तालुका पोलिस स्टेशनला जमा केला. जखमी व मयत अशा तिघांना रुग्णालयात दाखल केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिस स्टेशनला या अपाघाताची नोंद झालेली नव्हती.







