जळगाव : पोलिस चालक शिपाई परिक्षेच्या वेळी परिक्षार्थींनी आपापसात उत्तरांवर खुणा केलेल्या प्रश्नपत्रिकांची अदलाबदल केल्याप्रकरणी कापुरबावडी (ठाणे शहर) पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाच परिक्षार्थी उमेदवारांमधे जळगाव जिल्ह्याच्या भडगाव येथील अनिकेत दिनकर पाटील (महादेव गल्ली भडगाव – जळगाव) या तरुणासह एकुण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
26 सप्टेबर रोजी ठाणे येथील विद्या प्रसारक विद्यालय बाळकुम, ठाणे या परिक्षा केंद्रावर पोलिस चालक शिपाई भरतीची लेखी परिक्षा होती. या परिक्षेच्या वेळी देवेंद्र शिवाजी बोरसे (कावळे ता. साक्री जि. धुळे), बापू दिगंबर गावडे (बारामती), प्रफुल्ल विजय मंडाले (भैरवनाथ मंदीराजवळ किरकट वाडी सिंहगड रोड पुणे), मनोज विनायक पिंपरे (देऊळवाडी ता. उदगीर जिल्हा लातुर) व अनिकेत दिनकर पाटील (भडगाव जिल्हा जळगाव) असे पाच जण परिक्षा देण्यासाठी आलेले होते.
परिक्षेचे नियम माहिती असून देखील या पाच परिक्षार्थी तरुणांनी संगनमत करुन प्रश्न पत्रिकेवर उत्तरांच्या कुणा करुन त्या प्रश्नपत्रिका आपसात अदलाबदल करुन तोतयेगिरी करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अतुल सदाशिव लंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा कापुरबावडी (ठाणे शहर) पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.







