जालना : दारू पिण्याच्या वादातून लाथाबुक्क्यांनी झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लिंबाजी गणपत वर्गणे (60) असे मयत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.
रविवारच्या रात्री रामचंद्र वरखडे यांच्या शेतानजीक मयत लिंबाजी गणपत वर्गणे व संशयित अर्जुन अण्णा सोनवणे या दोघांमधे मद्यपानावरुन कडाक्याचा वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन लाथाबुक्क्यांनी मारहाणीत झाले होते. या मारहाणीत लिंबाजी गणपत वर्गणे यांच्या बरगडीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली व नंतर त्यांचा मृत्यू झाला.
दमता वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी अर्जुन सोनवणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संशयीत अर्जुन सोनवणे हा आरोपी फरार असून पुढील तपास सुरु आहे. घटनास्थळाला उपविभागीय अधिकारी इंदल बहुरे यांनी भेट देत तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांना पुढील तपासकामी सुचना दिल्या आहेत.




