जळगाव, दि. 2 (प्रतिनिधी) गांधीजींच्या विचारांची सदृढ प्रशासनासाठी आजही अपरिहार्यता आहे. आजच्या काळात पोलिस व नागरीकांना देखील महात्मा गांधीजींचे विचार अवलंबले तर सर्व काही सुरळीत होईल. गांधीजींचा विचार अभ्यास, विचारांपुरता मर्यादित न ठेवता गांधी विचाराने प्रत्यक्ष जगणं आवश्यक आहे. असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी केले. ‘महात्मा गांधी आणि पोलीस’ याबाबत व्याखानात ते बोलत होते. गांधीतीर्थ येथील कस्तुरबा हॉलमध्ये विश्व अहिंसा दिवस, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 153 वी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची 118 वी जयंती साजरी करण्यात आली. आरंभी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महनीय पुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार आणि पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या ऑनलाईन व्याख्यानात ते म्हणाले की, पोलीस आणि अहिंसा या बाबत विरोधाभास दिसतो. एका कोरियन विद्यार्थ्यांने गांधीजींना प्रश्न विचारला होता की पोलीस, सैन्य आणि अहिंसा हे तत्व कसे? त्यावर पोलीस, सैन्य यांना अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी सहन करू शकतो असे उत्तर गांधीजींनी दिले होते. पोलीस, कोर्ट, कारागृह यांचा कमीत कमी उपयोग व्हावा असा समाज अपेक्षीत आहे. गुन्हेगाराला रुग्ण, कारागृहाला दवाखाना आणि पोलीसाला डॉक्टर अशी उपमा महात्मा गांधीजींनी दिलेली आहे. गुन्हेगारांचे पुनर्वसन किंवा त्यांच्यात सुधारणा करायची त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे महत्त्वाचे विचार महात्मा गांधीजींनी शंभर वर्षांपूर्वी व्यक्त केले आहेत. ते विचार आजच्या परिस्थितीत देखील अत्यंत समर्पक आहेत याबाबतचे दाखले डॉ. मुंढे यांनी व्याख्यानात दिले.
पोलीसांना आणि आंदोलनकर्त्यांसाठी गांधीजींनी काही मोलाच्या सूचना केल्या आहेत. असहकार व सविनय कायदे भंगाचे आंदोलन करताना पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांनुसार जनतेने आंदोलन करावे. तसे केल्यास रौलट एक्ट 2-3 महिन्यातच रद्द झाला असता पण त्यावेळी ते तसे न घडल्याने त्यास 3 वर्षे लागली. हे त्यांनी 1919 ला रौलट कायद्याबद्दल सोदाहरण सांगितलं. बंद पुकारण्याबाबत गांधीजींनी महत्वाचे असे सांगितले की बंद बळजबरीचा नसावा तो स्वयंस्फुर्त असावा, तो लादलेला नसावा. लंडन पोलीस व नागरिकांचे संबंध याचा दाखला देत भारतातील नागरिक व पोलीस यांचे संबंध सुदृढ असायला हवे, असे त्या काळी मार्गदर्शन केले. जमावाला डोकं नसते हा उल्लेख करतांना त्यांनी आफ्रिकेतील एक सुंदर प्रसंग सांगितला. गांधीजींना जमवाचा रोष सहन करावा लागला. गांधीजींनी शिपायाचा वेष धारण केला आणि जमावपासून बचाव केला. तेथील पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे महात्मा गांधी बचावले. चंपारणची घटना देखील त्यांनी उदघृत केली, तुमच्यावर अन्याय होत असेल, पोलिसांनी संपत्ती लुटली, स्त्रियांच्या अब्रूला धोका पोहोचविला तर त्याला विरोध करा असे गांधीजी सांगतात. त्याच बरोबर ते असेही सांगतात की, एक पोलीस नोटीस बजावायला आला त्याला विरोध केला, त्याला दगा फटका केला तर चालणार नाही. जनतेने तसे करू नये असे ही गांधीजी म्हणतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुदर्शन आयंगार आपल्या मनोगतात म्हणाले की, जगात सर्व बाजूने हिंसा वाढत आहे. नागरिक आणि पोलीस अश्या दोन्ही बाजूने हिंसा होत आहे. परंतु जीवन शैली मुळे होणाऱ्या हिंसेवर देखील विचार करणे आवश्यक आहे. फक्त जन्मदिन साजरा करणे महत्वाचे नसून त्या पुरुषांचे विचार आपल्या जीवनात अवलंबन करणे मोलाचे ठरेल. जळगाव पोलीस आपली वेगळी ओळख निर्माण करावी अशी अपेक्षा डॉ आयंगार यांनी व्यक्त केली. गांधीतीर्थचे निर्माता भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून गांधीतीर्थ साकारले आहेत गांधी विचारांसाठीचे उत्तम व्यासपीठ त्यांनी निर्माण केलेले आहेत त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन घडू शकते असेही ते आवर्जून म्हणाले.
अहिंसेची शपथ…
विश्व अहिंसा दिवसाच्या औचित्याने उपस्थितांना जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन यांनी अहिंसेची शपथ दिली. त्याचप्रमाणे त्यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. पोलीस दलाच्या सहकाऱ्यांसाठी गांधी विचार संस्कार परीक्षा घेतली जावी जेणे करून पोलीस बांधवांमध्ये महात्मा गांधीजींचे विचार रुजू शकतील. त्या दृष्टीने गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रयत्न सुरू आहेत असें सांगितले.
कस्तुरबा सभागृहातील हा कार्यक्रम युट्युब व फेसबुकवर थेट प्रक्षेपित करण्यात आला, त्याचा अंदाजे 4000 जणांनी लाभ घेतला. या दोन्ही ठिकाणी गांधीतीर्थ चॅनेलवर हा कार्यक्रम कायम पाहाता येईल. महात्मा गांधीजींची जयंती ही चरखा जयंती म्हणून ही साजरी होते, या निमित्त गांधी तीर्थ येथे दरवर्षीप्रमाणे यादिवशी अखंड सुत कताई सुरू होती. सायंकाळ पर्यंत 16 चरख्यांवर दिवसभरात सुतकताई झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्याहस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. निखिल क्षीरसागर, भूषण गुरव व अनुभूती इंटरनॅशनल रेसीडेन्सी च्या विद्यार्थांनी ‘वैष्णव जन तो तेने कही ये…’ भजन सादर केले. प्रास्तविक गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आश्विन झाला यांनी वर्षभरात पार पडलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले तर आभारप्रदर्शन सुधीर पाटील यांनी केले. राष्ट्रीय पातळीच्या एकांकीका स्पर्धेचा निकाल गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन यांनी जाहीर केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
स्वानुभूतीसाठी पीसवॉक…
आजच्या प्रसंगी पहाटे जैन हिल्स वर “स्वानुभूती”साठी “पीस वॉक” आयोजित करण्यात आला. ह्या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्याची भूमिका समजावली. गांधी तीर्थचे डॉ.अश्विन झाला ह्यांनी आपल्या जीवनात पंचमहाभूत तत्वांचे महत्व विषद केले. अग्नि, वायु, जल, पृथ्वी, आकाश है मानव जीवनात पदोपदी कसे उपयोगी सिद्ध होतात, आपल्याला वेगळी दृष्टि देतात ह्या वॉक च्या निमित्ताने त्याची अनुभूति यावी. “पीस वॉक” मध्ये पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, पोलिस उप अधीक्षक कुमार चिंथा, भास्कर डेरे, बाबासाहेब ठोम्बे, अंबादास मोरे, रामकृष्ण कुंभार, सुरेश शिंदे, संतोष सोनवणे, वी.डी.ससे हे वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच मुक्त पत्रकार दिलीप तिवारी, जैन इरिगेशनचे अनिल जोशी व नितीन चोपड़ा सहभागी झाले होते.