धुळे : जितेंद्र मोरे हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. चार वर्षापुर्वी तो वरखेडी येथील तरुणीसोबत विवाहबद्ध झाला होता. त्याच्या संसार वेलीवर अडीच वर्षाच्या हेमांशूचे आगमन झाले होते. एकंदरीत त्याचे वैवाहिक जिवन सुरळीत सुरु होते. धुळे शहरातील मोगलाई परिसरातील फुले नगरात तो आपल्या आईवडीलांसह रहात होता.
गरुड कॉम्प्लेक्स येथील ट्रॅकवन कुरीयर ऑफीसमधे तो कामाला होता. मेहनती असलेला जितेंद्र दररोज सकाळी नऊ वाजेपासून कामाला जात असे. दुपारी तिन वाजता जेवणासाठी घरी आल्यानंतर तो पुन्हा कामाला जात असे. रात्री दहा वाजता काम आटोपून तो घरी परत येत असे. असा त्याचा नित्यक्रम ठरलेला होता. त्याची पत्नी माहेरी गेली होती. त्यानंतर काही दिवसातच लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी अडकली होती. तिला घ्यायला जाण्याचे देखील त्याचे नियोजन सुरु होते. मात्र कामाच्या व्यापात आणी लॉकडाऊनमुळे त्याला जाणे शक्य होत नव्हते.
10 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता तो नेहमीप्रमाणे सकाळी कुरीयरच्या कार्यालयात कामाला आला. दुपारी त्याने ऑफीसमधेच जेवण केले. सायंकाळी सात वाजता तो घरी गेला. मात्र गाडीत पार्सल लोड करण्याचा निरोप आल्यामुळे त्याला रात्री 9.30 वाजता पुन्हा कार्यालयात जावे लागले. गाडीत पार्सल लोड केल्यानंतर त्याने दुकान मालक ब्राम्हणकर यांना दुचाकीने वाटेत त्याच्या घराजवळ सोडले.
एव्हाना रात्र झालेली होती. थकलेला जितेंद्र वाटेत कालिका देवी मंदिराजवळ थोडा वेळ बसला. रात्रीची वेळ होती व तो परिसरात एकटाच विचार करत बसला. उद्या पत्नीला घेण्यासाठी जाण्याचे तो मनातल्या मनात नियोजन करत होता. त्याने पत्नीला तसा फोन देखील लावला. मात्र त्याचे नियोजन नियतीला मान्य नव्हते. ती रात्र त्याच्यासाठी काळरात्र ठरली.
तो बसलेला असतांना त्याठिकाणी काही वेळाने राहुल व हर्षल हे दोन्ही गुन्हेगारी वृत्तीचे तरुण त्याच्याजवळ आले. त्यांनी एकट्या जितेंद्रला हेरले. त्यांनी त्याच्याजवळ पैशांची मागणी सुरु केली. आपल्याकडे पैसे नाहीत असे त्याने दोघांना सांगितले. तरी देखील दोघांनी त्याला पैशांची मागणी सुरुच ठेवली. वारंवार पैसे मागून देखील पैसे मिळत नसल्यामुळे दोघे जितेंद्रवर चिडले. त्यांनी त्याला लुटण्याचा प्रयत्न सुरु केला.
पैसे मिळत नाही म्हणून त्यांनी त्याच्या हातातील मोबाईल लुटण्याचा प्रयत्न सुरु केला. दोघेजण आपला मोबाईल हिसकावत असल्याचे बघून जितेंद्रने त्यांना प्रतिकार सुरु केला. मोबाईल हिसकावण्यापासून होत असलेला प्रतिकार बघून दोघे त्याच्यावर अजूनच चिडले. चिडलेल्या हर्षलने जवळच पडलेला दगड उचलला. तो दगड त्याने जितेंद्रच्या चेह-यावर हाणला. दगडाचा मार बसल्यामुळे जितेंद्र जमीनीवर कोसळला.
जितेंद्रने मान खाली घालताच पुन्हा त्याच दगडाने जितेंद्र यास घायाळ करण्यात आले. दगडाच्या घावात जितेंद्रचा तेथेच मृत्यू झाला. अशा प्रकारे घरातून निघालेला जितेंद्र त्या रात्री घरी परतलाच नाही. संतापाच्या भरात दोघा गुन्हेगार तरुणांनी जितेंद्रचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच त्याची दुचाकी तेथेच फेकून देत तेथून पोबारा केला.
दुस-या दिवशी 11 जुलैच्या सकाळी मॉर्नीग वॉकसाठी आलेल्या एका जणाचे त्याच्या मृतदेहाकडे लक्ष गेले. त्यामुळे या खूनाची वार्ता परिसरात पसरण्यास वेळ लागला नाही. घटनास्थळावर डीवायएसपी सचिन हिरे, शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. हेमंत पाटील, स.पो.नि.श्रीकांत पाटील, पोलिस उप निरिक्षक शरद पाटील, सहायक फौजदार प्रकाश पाटील, पो.कॉ. मुख्तार मंसुरी, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, प्रल्हाद वाघ, निलेश पोतदार, सचिन साळूंखे आदी घटनास्थळावर हजर झाले.
पोलिस पथकासोबत श्वान पथक व ठसे तज्ञ दाखल झाले. मयताची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. मात्र या घटनेतील मारेकरी कोण ? त्यांनी जितेंद्र यास कोणत्या कारणासाठी मारले हे प्रश्न सर्वांसाठी अनुत्तरीत होते. धुळे शहर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नीला घेण्यासाठी त्याला आज सासरी जायचे होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बुधवंत यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने आपली समांतर तपास यंत्रणा कामाला लावली. खूनाच्या रात्री बसस्थानकाकडून जाणाऱ्या काही तरुणांना कमलाबाई हायस्कूलजवळ लुटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करणाऱ्या तरुणाचा मोबाइल दोन तरुणांनी लुटल्याची देखील माहिती एलसीबी पथकाला मिळाली. खून झालेल्या जितेंद्रचा देखील मोबाईल गायब झाल्याची तक्रार होतीच. मोबाईलसाठी लुटालुट केल्याप्रकरणी दोघा तरुणांचा शोध सुरु झाला.
पथकाने पावसात जाऊन दोघा टवाळखोर तरुणांचा शोध घेतला. तपासात गुन्हेगारी वृत्तीचे हंक्या ऊर्फ राहुल घोडे व हर्षल पाटील यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दोघांना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बुधवंत यांच्या समक्ष हजर करण्यात आले. दोघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. याशिवाय दोघा गुन्हेगार तरुणांचे मोबाईल लोकेशन व सिडीआर तपासण्यात आला.
घटनेच्या रात्री दोघांचे मोबाईल लोकेशन खून झालेल्या घटनास्थळी असल्याचे निष्पन्न झाले. जितेंद्रचा मोबाइल हरवल्याचा दावा आणि दोघा मारेक-याचे मोबाईल लोकेशन एक झाल्यामुळे तपासाचे धागेदोरे मिळण्यास मोलाची मदत झाली. लुटमारीतून हा खून झाल्याचे त्यांनी पोलिसांजवळ कबुल केले.
गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांनी एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक हनुमान उगले, कर्मचारी रफीक पठाण, श्रीकांत पाटील, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, मयूर पाटील, तुषार पारधी, गुलाब पाटील यांचे कौतुक करण्यात आले. या प्रकरणातील संशयित राहुल याच्यावर यापूर्वी लुटमारीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.
केवळ मोबाइलसाठी खून होणे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यातून रात्रीच्या वेळी शहरात गुन्हेगारी वृत्तीचे तरुण फिरतात हे या घटनेतून अधोरेखीत झाले आहे. शिवाय धुळे शहरातील गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचे देखील या घटनेतून पुढे आले आहे. मारेकऱ्यांना जितेंद्रकडे रोकड मिळाली नाही. त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या साध्या मोबाइलसाठी त्याचा खून झाला.
खुनाचा घटनाक्रम बघता पत्नीला घेण्यासाठी जात असल्याचे कारण आई वडिलांना सांगून जितेंद्र घरातून निघाला. परंतु तो गावी गेलाच नाही. घरी जाताना रात्री 10 वाजून 55 मिनिटांनी त्याचे पत्नीशी मोबाइलवरुन बोलणे झाले होते. या सर्व गोष्टी जितेंद्र हा कुटुंबवत्सल, कष्टाळूवृत्तीचा असल्याचे दिसून येते. पत्नीला घेण्यासाठी जाण्यासाठी त्याने वडिलांची चप्पल पायात घातली होती. यावरून त्याची आर्थिक परिस्थिती देखील लक्षात येते. त्याच्या अंत्यविधीच्या खर्चासाठी समाजबांधव मदतीला धावून आले. या गुन्हयाचा पुढील तपास धुळे शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील करत आहेत.