गोंदीया (अनमोल पटले) : देवटोला ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामात भ्रष्टाचाराच्या तक्रारी असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत दोषी सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कनिष्ठ अभियंता (मनरेगा), कनिष्ठ अभियंता (आवास योजना) यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थ आग्रही आहेत. संबंधीत दोषींवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थ बेमुदत उपोषणाच्या तयारीत असल्याचे देखील म्हटले जात आहे.
पंचायत समिती अंतर्गत देवटोला-पिपरटोला ग्रामपंचायतीस मिळालेल्या शासकीय निधीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे म्हटले जात असून ग्रामस्थांनी याप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी गेल्याचे समजते.
देवटोला – पिंपरटोला ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध मैदानांच्या सपाटीकरणाचे काम सरपंच रामेश्वर हरीणखेडे यांनी जेसीबी व टॅंकर लावून केले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जनावरांना बांधण्यासाठी गावात गोठा, शोष खड्डे तयार करण्यात आले आहेत. या कामात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार काही ग्रामस्थ करत आहेत. मजुरांच्या हाताला काम मिळावे आणी त्यांना त्यातून रोजगार मिळायला हवा असा शासनाचा हेतू असतो. मात्र सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कनिष्ठ अभियंता(मनरेगा) आदींची मिलीभगत असल्यामुळे मशिनरीच्या माध्यमातून सदर कामे पुर्ण केल्याचे उघडपणे म्हटले जात आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. बोगस हजेरीपट दाखवून लाखो रुपये काढणे, जुन्या घरांना रंगरंगोटी करुन नविन घर भासवून देयक काढणे असे आरोप केले जात आहेत.