कपाशीचे योग्य व्यवस्थापन उत्पादनास फायदेशीर- डॉ. बी.डी. जडे

वाकोद दि. 8 ऑक्टोबर : कापूस उत्पादक शेतकरी बंधूनी अजूनही कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळणे शक्य आहे असे जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी.डी. जडे यांनी वाकोद येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक कापूस दिनानिमित्त आयोजित कापूस परिसंवाद मध्ये मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

सातत्याने झालेल्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पात्या, फुले गळ व बोंड सड ह्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी वेळ न घालविता कापूस पिकाचे सध्या परिस्थितीमध्ये अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर सततच्या पावसामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये निचराद्वारे झिरपून गेली आहेत त्यामुळे कापूस पिकाला पोषणाची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांच्या कापूस पिक ठिबक सिंचन पद्धतीवर आहे त्यांनी ठिबक मधून युरीया, 12:61:0 आणि पांढरा पोटॅश एकत्रित देणे गरजेचे आहे. सोबत मॅग्नेशियम सल्फेट आणि चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये आठवड्यातून एक वेळा द्यावे ज्यांच्या कापूस पिकामध्ये ठिबक नाही त्यांनी 10:26:26 रासायनिक खत 1 बॅग, युरीया 1 बॅग द्यावे. खते मातीने झाकून द्यावीत. तसेच 13:40:13 ची फवारणी करावी.

बुरशीयुक्त रोगापासून तसेच बोंड सडच्या नियंत्रणाकरीता कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम आणि स्टेप्टोसायक्लीन 1 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाकरीता एकात्मिक किड व्यवस्थापनचा अवलंब करताना शेतात एकरी 5 कामगंध सापळे लावावेत, निंबोळी अर्काची फवारणी करावी नंतर आठवड्याने प्रोफेनोफॉस किंवा थायोडीकार्बची फवारणी करावी. प्रकाश सापळे लावावेत. रस शोषण करणारी किडी मावा, तडतूडे, फुलकिडे, पांढरी माशी नियंत्रणाकरीता पिवळे, निळे चिकट सापळे लावावेत तसेच आंतरप्रवाही किटक नाशकांची फवारणी करावी. ह्यामुळे निश्चितच कापूसाचे उत्पादन चांगले मिळेल असे डॉ. जडे ह्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिलीत. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जानेवारी अखेरपर्यंत कापूस पिक संपवावे, कापसाचे कोणतेही अवशेष शेतात राहणार नाही याची काळजी घ्यावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष धोंडूराव वानखेडे, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोद राजपूत, मंगेश देशमुख, मनोज पाटील, जैन ठिबकचे वितरक मोहन देशमुख, भास्कर पाटील, उपसरपंच भगत प्रकाश जैन, रमेशभाऊ आस्कर, राहुल आस्कर, डॉ. संतोष चौधरी, संजय सपकाळे, होळे महिला शेतकरी, परिसरातील शेतकरी उपस्थित होते. श्री. विलास जोशी सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर जैन फॉर्मचे विनोद राजपूत यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here