जळगाव : नशिराबाद येथील जि प शाळा क्रमांक एकमध्ये झालेल्या शिबिरात देवकर हॉस्पिटलतर्फे 617 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैया पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी हॉस्पिटलचे संस्थापक व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे हे उपस्थित होते.
शिबिरात रक्तदाब, मधुमेह, नेत्रविकार, महिलांच्या गर्भपिशवीचे, पोटाचे आजार अशा विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटप करून काही रुग्णांना पुढील उपचाराचा सल्ला देण्यात आला. यावेळी शासकीय योजनांमध्ये बसत असलेल्या आजारांवर देवकर हॉस्पिटलतर्फे मोफत उपचार करण्यात येतील, असेही श्री. देवकर यांनी स्पष्ट केले. तसेच केवळ एक लाख रुपयात कृत्रिम गुडघा सांधेरोपण व पाच हजार रुपयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची घोषणा हॉस्पिटलचे संस्थापक श्री. देवकर यांनी केली.
यावेळी अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष व सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, सईद मलिक, सुमित शिंदे, राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष पंकजभाऊ महाजन, बरकत अली, युवक जिल्हा उपाध्यक्ष चंदू पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष निलेश रोटे, सय्यद काझी, नितेश पाटील, महिला पदाधिकारी संगीता बोंडे आदी उपस्थित होते. गेल्या रविवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी भादली येथे झालेल्या शिबिरात 567 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती.