नाशिक : प्रशस्त लॉन म्हटले म्हणजे मंगल कार्यासाठी दिले जाते असे सर्वश्रृत आहे. मंदीच्या कालावधीत हेच लॉन एखाद्या कपड्यांच्या अथवा वस्तूंच्या सेल साठी देखील दिले जातात. मात्र कोरोना कालावधीत लॉन चालकांना झालेला तोटा भरुन काढण्यासाठी हेच प्रशस्त लॉन बेकायदा धंद्यासाठी देखील दिले जात असल्याचे नाशिकच्या एका घटनेतून उघड झाले आहे.
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील चांदोरी या गावात असलेले उदयनराजे लॉन थेट देशी बनावट देशी दारुच्या निर्मितीसाठी देण्यात आल्याचे उघड झाले आहे. नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या लॉनवर मध्यरात्री कारवाई करण्यात आली. या कारवाईत बनावट देशी दारुचे जवळपास 1500 ते 2000 बॉक्स, सुमारे दहा हजार ते पंधरा हजार देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, 20 हजार लिटर स्पिरिट, दोनशे लीटरचे जवळपास 100 बॅरेल, 5 ते 10 हजार रिकामे बॉक्स, देशी दारु निर्मीतीचे साहित्य, 5 पाण्याच्या टाक्या, एक ट्रक असा जवळपास एक कोटी मुल्य असलेला मुद्देमाल नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतला आहे.
औरंगाबाद राज्य मार्गावर निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीत चांदोरी या गावी अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे हे लॉन्स आहे. उदयनराजे लॉन्स येथे बेकायदा देशी मद्याची निर्मीती सुरु असल्याची माहिती मिळाल्याने टाकण्यात आलेल्या धाडीत संजय मल्हारी दाते (गोंदेगाव ता. निफाड) हा आढळून आला. पुढील तपास सुरु आहे.