जळगाव : जामनेर पोलिस स्टेशन हद्दीत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून खूनाचा उलगडा देखील झाला आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून त्याने खूनाचा गुन्हा कबुल केला आहे. राहुल पंढरी पवार (22) रा. नेरी ता. जामनेर असे मयताचे तर समाधान नारायण कुमावत (बेलदार) रा.नेरी ता.जामनेर असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
8 ऑक्टोबर 2021 रोजी जामनेर पोलिस स्टेशन हद्दीतील गाडेगाव शिवारातील विहीरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सुरुवातीला जामनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा व जामनेर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त तपासात या मृतदेहाची ओळख पटवून खूनाचा छडा लावण्यात आला आहे. घटनास्थळी मृतदेहाच्या गळ्याला दोरीचा फास दिसून आला होता. तसेच त्याठिकाणी पाण्याच्या व दारुच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. पोलिस पथकाने आजुबाजूच्या परिसरात तपास केला असता मयताचे नाव राहुल पंढरी पवार असे निष्पन्न झाले. त्याचे मित्र व नातेवाईक यांचा शोध घेत चौकशी केली असता तो आणि त्याचा मित्र समाधान नारायण कुमावत असे दोघे जण पोलिस भरतीचा सराव करत असल्याचे निष्पन्न झाले.
घटनास्थळी मिळून आलेल्या दारुच्या व पाण्याच्या बाटल्या गाडेगाव येथील हॉटेल शशीप्रभा येथून विक्री झाल्याचे तपासात उघड झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधे त्या दारुच्या व पाण्याच्या बाटल्या घेऊन जात असतांना समाधान नारायण कुमावात आढळून आला. दोघे जण गाडेगाव शिवारात दारु पिण्यास बसले होते. दोघांना मद्याची धुंदी चढल्यानंतर दोघात व्यवहाराचा वाद सुरु झाला. संशयीत समाधान कुमावत याचे मयत राहुल पवार याच्याकडे काही पैसे बाकी होते. त्या पैशाच्या कारणावरुन दोघात वाद सुरु झाले. शब्दामागे शब्द वाढत गेल्याने संतापाच्या भरात समाधान कुमावत याने राहुल पवार याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह नजीकच्या विहीरीत फेकून दिला. या सर्व घटनाक्रमानंतर समाधान कुमावत याने घटनास्थळावरुन पलायन केले होते.
याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला समाधान कुमावत याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान कुमावत यास अटक करण्यात आली असून एलसीबी पथकाने त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासकामी दिले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले याच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.अशोक महाजन, स.फौ.रमेश जाधव, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोहेकॉ संदीप सावळे, पोहेकॉ जयंत चौधरी, पोना किशोर राठोड, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोना रणजीत जाधव, पोना नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील,पोकॉ विनोद पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, तसेच जामनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरी.अंबादास पाथरवट, पोहेका रमेश कुमावत,,पोहेकॉ. सुनिल राठोड, पोकॉ सचिन पाटील, पोकॉ अतुल पवार, पोकॉ. तुषार पाटील, पो.कॉ. निलेश घगे, चापोहेकॉ शाम काळे, चापोहेकॉ संदीप पाटील आदींनी तपासकामी सहभाग घेतला.