मद्यधुंद मुलानेच केली पित्याची हत्या

यवतमाळ : क्षुल्लक कारणामुळे झालेल्या वादात मद्यधुंद मुलाने जन्मदात्या पित्याच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारुन हत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिस स्टेशन हद्दीत अमृतनगर या गावी घडली. 12 ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी खंडाळा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे. मारोती तुकाराम गादेकर (62) असे हत्या करण्यात आलेल्या पित्याचे तर अनिल मारोती गादेकर (35) असे संशयीत मुलाचे नाव आहे.

शेतातील सोयाबीन विक्री करुन आलेली रक्कम खर्च करु नको, लोकांची उधारी द्यायची आहे असे मयत मारोती गादेकर यांनी त्यांचा मुलगा अनिल यास घटनेच्या रात्री म्हटले होते. वडीलांच्या बोलण्याचा राग आल्यामुळे अनिल याने लोखंडी हत्याराने त्यांचा खून केला. या घटनेच्या वेळी जमलेल्या लोकांना ठार करण्याची धमकी देत अनिल याने घटनास्थळावरुन पळ काढला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या अनिल गादेकर यास शोधून काढले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली. खंडाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालजी शेंगेपल्लू पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here