मुंबई : पोलिस शिपाई म्हणून पोलिस दलात रुजू झाल्यानंतर पोलिस नाईक, पोलिस हेड कॉन्स्टेबल व सहायक फौजदार अशा मार्गाने पदोन्नतीचा प्रवास केल्यानंतर सेवानिवृत्तीचे वेध लागतात. साधारणपणे एका पदावर 12 ते 15 वर्ष सेवा बजावल्यानंतर पदोन्नती मिळते. कित्येक वर्ष पोलिस दलात सेवा बजावल्यानंतर देखील पोलिस हवालदारांचे पीएसआय होण्याचे स्वप्न पुर्ण होत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या समस्येवर फुंकर घालत पोलिस हवालदारांना दिलासा दिला आहे. पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेला कर्मचारी हवालदार झाल्यानंतर पीएसआय म्हणून सेवानिवृत्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विजया दशमीच्या मुहुर्तावर केली आहे.
हवालदारांच्या पदोन्नतीबाबतच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा काही महिन्यात 45 हजार हवालदार, सहायक फौजदार (एएसआय) व पोलिस उपनिरिक्षकांना होणार आहे. या निर्णयामुळे पोलिस दलात सध्या असलेल्या 37861 हवालदारांची संख्या 51210 होणार आहे. 15270 सहायक फौजदारांची संख्या 17071 होईल. 15150 अतिरिक्त तपासी अंमलदार उपलब्ध होतील. प्रत्येक पोलिस स्टेशनला 13 अतिरिक्त अंमलदार मिळतील.