मुंबई : आक्रमक आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्यासह त्यांच्या परिवाराला जीवे ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत नितीन नांदगावकरांनी नेहरु नगर पोलीस स्टेशनला धाव घेत आपली कैफियत मांडली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते मनसेतून शिवसेनेत दाखल झाले होते.
डॅशिंग नेते आणि सोशल मीडियात प्रसिद्ध असा नितीन नांदगावकर यांचा परिचय आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पवईतील हिरानंदानी हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांच्या अवाजवी बिलाबाबत आंदोलन केले होते.
काल नितीन नांदगावकर यांना अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. त्यात त्यांना जीवे ठार करण्याची धमकी देण्यात आली. याबाबतची तक्रार त्यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, तीन दिवसांपूर्वी आपण शिवसेनेच्यावतीने हिरानंदानी रुग्णालयात जाऊन रिक्षाचालक कोरोना रुग्णाला देण्यात आलेले बिल कमी करण्यासह मृतदेह ताब्यात देण्याबाबत जाब विचारला होता. त्यावेळी आपला तेथील सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला होता. त्यावेळी रुग्णालयाचे सीईओ सुदीप चटर्जी यांनी आपल्याला दम देत आठ लाख रुपये भरा व मृतदेह घेऊन जा असे बजावले होते.
त्यानंतर मी रिक्षा चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या धक्काबुक्की नंतर सोमवारी सकाळी आपल्याला मोबाइलवर धमकीचा फोन आला. यासोबत शिविगाळ देखील करण्यात आल्याचा आरोप ली नितीन नांदगावकर यांनी तक्रारीत केला आहे.