जळगाव : जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील सोमानी मार्केटमधे संगणकावर फन टार्गेट गेम या नावाने खेळल्या जाणा-या जुगार अड्ड्यावर रात्री छापा टाकण्यात आला. या छाप्यात 28720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली असून दोघे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिस त्याच्या मागावर आहेत. रामानंद नगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांना समजलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आनंद शिंदे यांच्या गाळ्यात हा जुगार सुरु होता. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंंता यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री नऊ वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईने सट्टा व्यावसायीकांच्या गोटात खळबळ माजली आहे.
स्वप्निल वंसतराव शिंदे (सट्टा चालक) आनंद मंगल नगर पिंप्राळा हा सत्तू कटारिया याच्या सांगण्यावरुन गाळा मालक आनंद शिंदे याच्या परवानगीने हा जुगार अड्डा चालवत होता. फन टार्गेट या नावाने हा जुगार खेळला जात होता. हा गेम खेळण्यासाठी 0 ते 9 असे आकडे लिहिलेले बॅनर वापरले जाते. त्य बॅनरवर सट्टा खेळणारे ग्राहक त्यांचा मोबाईल ठेवतात. सट्टा चालक माऊस व की बोर्डचा वापर करुन संगणकावर जुगार चालवतात. ज्या ग्राहकाचा क्रमांक लागतो त्याला बक्षीसरुपाने पैसे दिले जातात असा हा खेळ आहे.
या कारवाईत स्वप्निल शिंदे याच्यासह मेहमुद कमरोद्दीन पिंजारी (मास्टर कॉलनी अशोक किराणाजवळ जळगाव), प्रविण प्रभाकर पाटील (गर्जना चौक पिंप्राळा), समाधान पंढरीनाथ चौधरी (गणपती नगर पिंप्राळा) यांना ताब्यात घेतले आहे. सिपीयु, मॉनीटर, स्पिकर, माऊस आदी साहित्य, रोख 870 रुपये असा एकुण 28720 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स.पो.नि. संदीप परदेशी यांनी टाकलेल्या या छाप्यप्रकरणी प्रकरणी रामानंद नगर पोलिसात हे.कॉ. रविंद्र मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.न. 299/21 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4, 5 व भा.द.वि. कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.