औरंगाबाद : अनैतिक संबंधांत अडसर ठरत असलेल्या पतीची त्याच्या पत्नीने एक लाख रुपयात सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चिखलठाणा पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली आहे.
पिसादेवी परिसरातील नाल्यात रामचंद्र रमेश जायभाये याचा मृतदेह आढळून आला होता. मयताची पत्नी मनिषा जायभाये, तिचा प्रियकर गणेश उर्फ समाधान सुपडू फरकाडे या दोघांना सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे राहुल आसाराम सावंत (सातारा परिसर) व निकितेश अंकुश मगरे (बालाजी नगर मोंढा नाका औरंगाबाद) यांच्यासोबत हत्येचा कट रचण्यात आला होता. या दोघांना एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. त्यापैकी विस हजार रुपयांची अग्रिम राशी देखील देण्यात आली होती.
20 ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास मनिषाचा पती रामचंद्र घरात झोपला असतांना गणेश याच्यासोबत राहुल सावंत, निकितेश मगरे यांनी घरात प्रवेश केला. मनीषा, गणेश व निकितेशने रामचंद्रचे हातपाय धरुन ठेवले. राहुलने रामचंद्रचे तोंड दाबून ठेवत त्याच्या गळ्यावर धारदार चाकूचे सपासप वार केले. त्यानंतर मयत रामचंद्रचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला.
स.पो.नि. गजानन जाधव, पोलिस उप निरीक्षक बालाजी ढगारे, अशोक रगडे, अश्विनी कुंभार, अजिनाथ शेकडे, बाबासाहेब मिसाळ, सुरेश साळवे, रवींद्र साळवे, दीपक देशमुख, दीपक सुरोशे, विशाल नरवडे, सुग्रीव घुगे, विशाल लोंढे, गणेश खरात, कृष्णा बरबडे, सचिन रत्नपारखे, तनुजा गोपाळघरे, ज्योती जैस्वाल, सीमा घुगे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.