मोबाईलसह रक्कम व इतर साहित्य चोरणारे दोघे अटक

जळगाव : मोबाईल विक्रेत्याच्या लाकडी टपरीतून तिन मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य चोरी करणा-या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. एक संशयीत फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

सुभाष सुरेशचंद जैन हा किरकोळ मोबाईल विक्रेता असून सुप्रिम कॉलनी परिसरात त्याची पार्टीशनची टपरी आहे. त्या टपरीत तो किरकोळ मोबाईलच्या विक्रीसह मोबाईलसाठी लागणारे इतर साहित्य विक्री करतो. 27 सप्टेबरच्या सकाळी त्याच्या टपरीतून पंधराशे रुपये किमतीचा एक व एक हजार रुपये किमतीचे दोन असे तिन मोबाईल चोरी झाले होते. त्याशिवाय दोन हजार रुपये रोख व इतर साहित्य असा एकुण साडे आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना पो.नि. प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे शुभम शिवराम मिस्तरी (रा. मरिमाता गल्ली जैनाबाद जळगाव) आणि राहुल रविंद्र कोळी (रा. मेस्को माता नगर जैनाबाद जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी सदर चोरीचा गुन्हा कबुल केला. त्यांनी पंधराशे रुपये किमतीचा एक मोबाईल पोलिसांना काढून दिला आहे. यापैकी एक संशयीत फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अटकेतील शुभम मिस्तरी याच्याविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशन येथे दोन व एमआयडीसी पोलिस स्टेशनला एक असे तिन गुन्हे दाखल आहेत. राहुल रविंद्र कोळी याच्याविरुद्ध शनिपेठ व एमआयडीसी पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक असे दोन गुन्हे दाखल आहेत. अटकेतील दोघा आरोपींना आज न्या. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. अटकेतील आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या निर्देशाखाली पोलिस हे.कॉ. रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, सचिन पाटील, मुकेश पाटील आदींनी तपासात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here