फिल्मी मेगास्टार शाहरुख खान पुत्र आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ही धाड टाकणारी केंद्रीय एजन्सी एनसीबी सह समीर वानखेडे, साक्षीदार पंच किरण गोसावी, प्रभाकर साईल यांची सोशल मीडियावर तुफानी पोलखोल झालीय. धाड टाकणारा अधिकारी वानखेडे म्हणतो जीवाला धोका आहे. क्रुझवर ड्रग्ज असल्याची टीप देणारा भानुशाली भाजप कार्यकर्ता निघाला. पंच साक्षीदार किरण गोसावी फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. यापूर्वीच्या दोन चार भागात तोच पंच असल्याची माहिती पुढे येतेय. गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्रावर खान कडून हे प्रकरण दाबून टाकण्याच्या मोबदल्यात २५ कोटी रुपयांची खंडणी मागणे- १८ कोटीत डील करणे, त्यातून ८ कोटी वानखेडे यांना दिले जाण्याची स्टोरी बाहेर आल्यावर दिवसभर खळबळ माजली. त्यात भर म्हणजे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे याच्या जन्मापासून तो मुस्लीम असल्याचे दस्तावेज केले. त्याने एका दलिताची नोकरी खाल्ली. त्याचा पहिला विवाह मुस्लीम तरुणीशी झाल्याची बाब निदर्शनास आणली.
नबाब मलिक यांनी उघड केलेली कुंडली वानखेडे यांनीही मान्य केली. तथापी, आपले पिता हिंदू आणि मातोश्री मुस्लीम अशा आंतरधर्मीय कुटुंबातून आपली वाटचाल झाली. आपल्या कौटुंबिक गोपनियतेचा भंग करुन त्रास दिला जात असल्याचे वानखेडे यांचे म्हणणे आहे. एन.सी.बी.च्या धाडीत केवळ ६ ग्रॅम हॅश किंवा चरस मिळाल्याचे बाहेर येत आहे. त्याची टीप देणारा इन्फॉर्मर आणि पंच गोसावी हे धाडसत्रात क्रूझवर असल्याचे उघड झाले.
वानखेडे गतवर्षी मालदीव, मुंबईत जावून आल्याचे फोटो झळकले. त्यांच्यासोबत त्यांची भगिनी लेडी डॉन म्हणून ओळखली जाणारी यास्मीन होती असे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे वानखेडे यांच्या कार्यपध्दतीवर बॉलीवुडमधील सिने अभिनेते यांना दहशतीत घेवून खंडणी वसुलीचा आरोप झालाय. धाड घालणारा म्हणतो जीवाची भीती वाटते, पंच म्हणतो जीवाची भीती वाटते, गोसावीच्या बॉडीगार्डलाही जीवाची भीती. त्याने पोलिस संरक्षण मागितले. गोसावी गायब होता. या गोसावीचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही. तो लखनौमध्ये शरण येतोय.
आपला देश एक कायदा समान असताना तसेच भाजपाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात शरणागती का? सहा ग्रॅम चरस सापडल्याने गांजा पुराण एनसीबीसह वानखेडे यांच्या गळ्याशी येईल, असे दिसते. परंतु हे ६ ग्रॅम चरस पकडल्याचा जोरात ढोल वाजल्यावर या वानखेडे यांना त्यांच्या खात्यात ६ महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.
अंबानी यांच्या अँटीलिया बंगल्यापुढील स्फोट प्रकरण, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण, वाझे प्रकरण तसेच हे एनसीबी धाड प्रकरण गाजतेय. २५ कोटींचा आरोप १८ कोटीची डील यातील पुरावे शोधले जातील. पंच साक्षीदार गोसावी म्हणतो सॅम डिसूझा याने मला क्रुझवर पाठविले. आर्यनच्या सुचनेवरुन त्याचे सॅमशी बोलणे करुन दिले. यात सक्रीय दिसणारी पात्रे, त्यांची संपर्कसुत्रे या सर्वांचे मोबाईल कनेक्शन तपासल्यास त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट होईल.
या सहा ग्रॅम चरस प्रकरणावरुन उठलेल्या गदारोळात यंदा गुजरातच्या बंदरात तीस हजार कोटींच्या ड्रग्जचा साठा पकडण्याची बाब उघड झाली असली तरी धक्कादायक म्हणजे अशाच दोन बड्या खेपा कारवाई न करताच सोडून दिल्याचे समोर येऊ पहात आहे. जी पकडली ती तिसरी खेप होती. हे ड्रग्ज रिफाईन करण्यासाठी तेथे आले होते असे सांगतात. ड्रग्ज म्हणजे अंमली पदार्थ म्हटले जाणाऱ्यात गांजा, चरस, हॅश, हशीश, हेराईन आणि एम.डी. अशी अनेक नावे आहेत. सन २०१२ च्या सुमारास अन्न औषध प्रशासनाने सोलापूर भागात छापा मारुन दोन हजार कोटींचा एम.डी. ड्रग्जचा साठा पकडला होता. त्यावरुन एफ.डी.अधिकाऱ्यांमध्येच जुंपली होती.
परंतु पुढे मात्र अनेकांच्या बदल्या करुन हे प्रकरण मिटवल्याचे म्हटले गेले. सेंट्रल एक्साईज डिपार्टमेंट बन्याचवेळा मद्यसाठे पकडतात. पण मालधनी फरार आणि मालसाठा बेवारस असा पंचनामा होतो. तसेच या प्रकरणातही नशिले गांजा-चरस पदार्थ अल्प प्रमाणात आढळले तर संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्याला सुधारण्याची संधी द्यावी अशी तरतूद सांगितली जात आहे. याच थेअरीचा वापर करुन गोसावीकरची २५ कोटी उकळण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.
२५ कोटी, १८ कोटी, ८ कोटी वानखेडेंच्या हिश्शाचे वाटप अशा संभाषणाच्या मुद्याचे आरोप पुढे येण्यापूर्वी आयर्नच्या समुपदेशनाचा मुद्दा चर्चेत आला होता. २५ कोटींच्या कथित खंडणीची स्टोरी प्लॅन्टेड म्हटली जातेय. तरीही हे प्रतिज्ञापत्रावर उघड करणाऱ्या गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याच्या तक्रारीवरुन आता वानखेडे यांचीच खातेनिहाय चौकशी होणार आहे. यापुर्वी वानखेडे, आर्यन यांनी त्यांना फसवले जात असल्याचे म्हटले होते. समीर वानखेडे हे देशासाठी काम करणारे प्रामाणिक अधिकारी असल्याचे आवर्जून सांगून झाले. लोकांनी हे लक्षात घ्यावे की, केंद्र असो की, राज्य प्रत्येक नोकरशहा, कर्मचारी देशासाठीच काम करतो. त्याचा पगार घेतो. त्याच्या कामाचे स्वरुप त्याला देशभक्तच ठरवते. लाच घेतली तर कायदा तुरुंगात घालतोच. तेच आता या प्रकरणात घडते.
अॅंटीलिया प्रकरणात स्कार्पिओ मोटारमालक मनसुख हिरेन याचा ज्या कृरपणे खून पाडला गेला ते बघून आता गोसावी, प्रभाकर यांना भीती वाटू लागली आहे. दोघे काही दिवस लपून बसले. गोसावी हा मात्र महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांवर अविश्वास दाखवतो. हाच बदमाशीचा पुरावा का मानू नये? देश एक, कायदा सर्वांना सारखा, कायद्यापुढे सर्व समान असे तत्व असतेच. कोणी जात, धर्म, बहुसंख्यांक, अल्पसंख्यांक असा बचाव का घेतात? असे प्रश्न पुढे येत आहेत. मघाशी म्हटल्याप्रमाणे हा गोसावी एनसीबीच्या यापूर्वीच्या काही कारवायात पंच दिसून आल्यास त्यावर विश्वास कसा ठेवावा? हा प्रश्न उरतोच.
शिवाय ज्यांच्या मॅनेजरकडे २५ लाखांची मागणी व १८ लाखांची डील झाल्याचे सांगतात त्या शाहरुख खान किंवा त्याचे मॅनेजर्स, सॅम डिसूझा आणि हवाला किटद्वारा संबंधितांना डिलची रक्कम पोहोचवण्याचा उल्लेख आल्याने या कथित योजनाबध्द ‘क्राईम स्टोरी’ चे बडे – छोटे सहभागी कलाकार जनतेपुढे आणले जातील काय? की दिवंगत राजपूत केस प्रमाणेच एनसीबीची ही केस अशीच अधांतरी लटकणार?