मुंबई : येस बँकेचा संस्थापक राणा कपूर यास जामिनावर सोडण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने नकार दिला आहे. येस बँक घोटाळ्याचा तपास संपला आहे. कागदी स्वरूपातील पुराव्यांची छेडछाड शक्य नाही. त्यामुळे त्याला कारागृहात ठेवण्याची गरज नाही, असे राणा याच्या वकिलांनी विशेष न्यायालयास सांगितले. मात्र, विशेष न्यायमूर्ती पी.पी. राजवैद्य यांनी राणाचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
पीएमएलएअंतर्गत राणा कपूर यास मार्च महिन्यात अटक केली होती. डीएचएफएलकडून राणा कपूर याच्या मुलीच्या कंपनीत वर्ग करण्यात आलेल्या ६०० कोटी रुपयांची चौकशी सक्तवसुली संचालनालयाकडून सुरु आहे. राणा कपूर, त्याची पत्नी व तीन मुली यात आरोपी आहेत. कर्जाची मोठी रक्कम मंजूर केल्या प्रकरणी राणा कपूरला एकूण ४,३०० कोटी रुपयांची लाच मिळाली आहे. त्याची देखील चौकशी ईडी आणि सीबीआय सध्या करत आहे.