हेमलता व निवृत्तीच्या दुचाकी चोरीची धमाल ! पोलिसांच्या जाळ्यात उघड झाली कमाल !!

जप्त दुचाकींसह पोलिस पथक

जळगाव : हेमलता पाटील पुरुषासारखे कपडे परिधान करत असे. अमळनेर येथे राहणारी हेमलता हिस मोटारसायकलवर स्वार होवून ती वेगात हाकण्याची अर्थात उडवण्याची कला तिला अवगत होती. पुरुषासारखे शर्ट व पॅंट घालून वाहन चालवणे तिला सोपे जात असे. तिचा चेहरा व कपडे बघून ती नेमकी महिला आहे की पुरुष हे लवकर कुणाला उमगत देखील नव्हते.

ती एका मुलाची आई आणि घटस्फोटीत महिला होती. आजच्या घडीला तिचे वय अवघे 34 वर्ष आहे. त्यामुळे ती एकदम तरुण दिसते. तीचे पुरुषासारखे राहणीमान बघता ती एका मुलाची आई असेल असे कुणाला वाटत देखील नव्हते. मोटार सायकल वेगाने हाकण्यात पारंगत असलेल्या हेमलता पाटीलचे लग्नानंतर तिच्या पतीसोबत काही जमले नाही. तिच्या संसार वेलीवर एका मुलाचे आगमन झाल्यानंतर तिने पतीला घटस्फोट देण्याचे ठरवले.

पतीला घटस्फोट देण्याकामी ती न्यायालयात चकरा मारत असे. त्यावेळी एका स्टॅप वेंडर सोबत तिचा नेहमी संपर्क आला. त्या स्टॅंप वेडरचा एक सहकारी वजा मित्र होता. त्याचे नाव निवृत्ती सुकलाल माळी असे होते. धरणगाव येथे राहणारा निवृत्ती माळी हा त्या स्टॅंप वेंडरचा मित्र होता. हेमलताचे त्या स्टॅंप वेंडरकडे नेहमी येणेजाणे होते.

त्या दरम्यान स्टॅप वेंडरचा मित्र निवृत्ती माळी व हेमलताची नेहमी नजरानजर होवू लागली. त्यातून एक चमत्कार झाला. दोघांनी एकमेकांच्या नजरेला नजर भिडवली. ती नजर दोघांच्या काळजात जावून रुतली व दोघांनी एकमेकांना आपले दिल एकमेकांना दिले आणि घेतले. स्टॅंप वेंडरच्या माध्यमातून निवृत्ती आणि हेमलता एकमेकांच्या अगदी जवळ आले. स्टॅंप वेंडरचा रोल संपला होता आणी दोघांचा रोल सुरु झाला होता.

निवृत्ती एक विवाहीत पुरुष होता. त्याचे आजच्या घडीला वय 48 वर्ष आहे. दोघांच्या वयात 14 वर्षाचे अंतर असले तरी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. विवाहित निवृत्ती यास दोन मुले व एक मुलगी असे तिन अपत्य असल्याचे समजते. तिन अपत्य आणि पत्नी असतांना तो चौदा वर्ष अंतर असलेल्या हेमलताच्या प्रेमात पडला.

बघता बघता दोघांचे प्रेम बहरत गेले. गेल्या सहा वर्षापासून दोघांच्या प्रेमाचा सिलसिला सुरु होता. हेमलता हिस वेगाने मोटार सायकल हाकण्याची सवय होती. त्यात ती चांगल्या प्रकारे पारंगत होती. तिच्या या कलेचा उपयोग करण्याचे दोघांनी ठरवले.

हॅंडल लॉक नसलेल्या मोटार सायकल गायब करायच्या आणि त्या कमी किमतीत विक्री करण्याचा कुविचार त्यांच्या मनात आला. त्या विचाराला मुर्त स्वरुप देण्याचे दोघांनी ठरवले. कमी श्रमात अधिक पैसा मिळवण्यासाठी दोघांचे नियोजन सुरु झाले. हेमलताने गाड्या चोरायच्या आणि त्याच वेळी निवृत्तीने गाडी मालकावर लक्ष ठेवायचे असे त्यांचे उद्योग सुरु झाले.

गाडी ताब्यात घेताच निवृत्ती तिच्य मागे डबलसिट बसत असे. चालकाच्या रुपातील व पुरुषी वेशातील हेमलता चोरलेली दुचाकी सुसाट वेगाने तिच्या गावी अमळनेर येथे घेवून जात असे. तिला तिच्या गावी अमळनेर येथे सोडल्यानंतर निवृत्ती त्याच मोटारसायकलने त्याच्या गावी धरणगाव येथे परत येत असे. चोरलेली ती मोटार सायकल तो अगदी कमी किमतीत ग्राहकांना विकत असे.

ग्राहकांना विश्वास बसण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅप पेपरवर करारनामा तो लिहून देत असे. काही गरज भासल्यास आम्ही आहोत असे ते ग्राहकांना ठासून सांगत असे. आपल्याला कवडीमोल किमतीत चांगल्या कंडीशनची मोटार सायकल मिळत असल्यामुळे ग्राहक देखील जास्त खोलात जात नव्हते. हा प्रकार गेल्या काही महिन्यापासून अव्याहतपणे सुरु होता.

या गैरप्रकाराची कुणकुण जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, हे.कॉ.संजय सपकाळे यांच्या कानावर आली. त्यांनी या प्रकाराची माहिती आपले वरिष्ठ असलेले पोलिस निरिक्षक बापू रोहोम यांच्या कानावर घातली. पो.नि. बापू रोहोम यांनी पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांचे मार्गदर्शन घेत पुढील कारवाईला सुरुवात केली.

पो.नि.बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, हे.कॉ.संजय सपकाळे यांनी या दुचाकी चोर प्रेमविरांच्या पाळतीवर राहण्यास सुरुवात केली. या चोरी प्रकरणातील निवृत्ती माळी हा धरणगाव येथे येणार असल्याची माहिती सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, हे.कॉ.संजय सपकाळे यांना समजली. त्याला ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या मदतीला स.फौ.अशोक महाजन , पोहेकॉ, दत्तात्रय बडगुजर, विनायक पाटील , किरण चौधरी, महेश महाजन, पल्लवी मोरे, वैशाली पाटील, पोहेकॉ. राजु पवार, इंद्रीस पठाण तसेच स.फौ.विजय पाटील,नरेंद्र वारुळे यांचा फौजफाटा देण्यात आला.

सापळा रचून  दोघांना चोरीच्या मोटारसायकलसह धरणगाव येथून ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश आले. त्यांनी आपली नावे निवृत्ती उर्फ छोटु सुकलाल माळी (48) रा.मोठा माळी वाडा, धरणगाव व  हेमलता देविदास पाटील(34) , व्हाईट बिल्डींग, खडडाजीन समोर अमळनेर अशी कबुल केली.

त्यांनी ज्या ज्या ग्राहकांन  चोरीच्या मोटार सायकली विकल्या होत्या त्या सर्व 24 ग्राहकांच्या ताब्यातून मोटार सायकली घेण्यात आल्या. दोघा चोरांच्य ताब्यातून एक मोटार सायकल व ग्राहकांच्या ताब्यातून 24 अशा एकुण 25 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या.

त्यात बजाज प्लॅटिना – 03 , हिरो पॅशन प्रो – 10 , हिरो स्लेंडर – 04 , हिरो डिलक्स् – 05 , होंडा शाईन – 02, बजाज सीटी – 01 अश्या एकुण 25 मोटार सायकली मिळून आल्या.

सर्व 25 मोटार सायकली विकत घेणा-या व्यक्तींविरुध्द भारतीय दंड संहिता – सन 1860 चे कलम 411 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या गुन्हयात ” कोणतीही चोरीची मालमत्ता , ती चोरीची मालमत्ता आहे हे माहित असताना किंवा तसे समजण्याला कारण असताना जो कोणी अप्रामाणिकपणाने ती स्वीकारील किंवा ठेवुन घेईल त्याला,तीन वर्षे असु शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जळगाव जिल्हयातील नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही वाहन खरेदी करतांना / व्यवहार करतांना त्या वाहनाची मुळ कागदपत्रे पाहुन मालकाबाबत खात्री करुनच वाहन विकत घ्यावे.

दोघा आरोपींना भाग-5 गुरन.34/2020 भादवि.क.379 या गुन्हयांचे तपास कामी एरंडोल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ताब्यातील वाहनांची एकुण संख्या 28 झाली होती.

बघा विडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here