जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननासह वाहतुकीने उच्छाद मांडला आहे. वाळूने भरलेल्या भरधाव वेगातील ट्रॅक्टर व डंपरच्या धडकेने अनेक जण आपल्या जीवाला मुकले आहेत. या पार्श्वभूमीवर अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूकदारांवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की दररोज होणाऱ्या या अपघाताच्या बातम्या सोशल मीडियासह वृत्तपत्रात वाचण्यात येतात. गेल्या दोन दिवसांपूर्वी दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जण ठार झाले आहेत. वाळू वाहतूक जनतेच्या जीवावर उठली असतांना प्रशासन गप्प कसे काय बसू शकते असा प्रश्न गुप्ता यांनी निवेदनाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. सर्वसामान्य जनतेला अवैध वाळूची वाहतूक दिसत असतांना ती प्रशासनाला का दिसत नाही असा प्रश्न देखील गुप्ता यांनी उपस्थित केला आहे. प्रशासन निद्रावस्थेत आहे काय? असा प्रश्न गुप्ता यांचा प्रशासनाला आहे.
सावखेडा शिवारातील वाघ नगर परिसर, गिरणा पंपींग परिसरातील बिबा नगरचा रस्ता, बांभोरी शिवारातून भोकणीकडे जाणारा रस्ता, जुन्या महामार्गालगत निमखेडी शिवार, आव्हाणे येथून जाणारा मरीमाता मंदिर व भवानी माता मंदिराकडील रस्ता, फुपनगरी येथून मुख्य नदीपात्राकडील जाणारा रस्ता, आव्हाणी व भोकणी परिसरातून थेट पाळधी मार्ग, शिवाजीनगर परिसरातून वाळूची वाहतूक सर्रास सुरु असते. दिवसरात्र 100 ते 150 वाळूची वाहने भुसावळच्या दिशेने जातांना जनतेच्या दृष्टीस पडतात.
24 नोव्हेंबरच्या दिवशी दीपककुमार गुप्ता यांनी स्वतः वाळूचे वाहन पकडून ते महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिले होते. त्यातील एका वाहतुकदाराने आमची 100 वाहने दररोज वाळू वाहतूक करत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले आहे. त्यानंतर जळगाव अजिंठा चौफुलीवर गॅंगवार झाल्याची घटना समोर आली. या घटनेत गोळीबार झाल्याचे देखील दबक्या आवाजात म्हटले जात आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अवैध वाळू उत्खनन व वाहतूकदारांविरुद्ध मोक्का अर्थात ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ तसेच एनपीडीए वापरुन कारवाईची मागणी गुप्ता यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. या वाहतूकीवर प्रतिबंध लावण्यासाठी रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.







