जळगाव : वडील रेल्वेत टी.सी.आहेत, त्यांच्या माध्यमातून रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सात लाख रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आकाश मनोहर पाटील, मनोहर वामन पाटील (रा.वडगाव,ता.रावेर) या पिता पुत्राविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या तरुणीच्या आईने एमआयडीसी पोलिसात या प्रकारणी फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादी महिलेस दोन मुली आहेत. दुस-या मुलीचा मित्र आकाश मनोहर पाटील हा फिर्यादी महिलेच्या घरी नेहमी येत जात असे. आपले वडील रेल्वेत टीसी आहेत. त्यांच्या ओळखीने फिर्यादी महिलेच्या मोठ्या मुलीस नोकरी लावून देण्याचे त्याने आमिष दाखवले.
या कामासाठी त्याने वडिलांच्या समक्ष वेळीवेळी विविध रकमा घेतल्या. ती रक्कम हळूहळू सात लाखाच्या घरात गेली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने एमआयडीसी पोलिसात दोघा पिता पुत्राविरुद्ध रीतसर फसवणूकीची तक्रार दाखल केली. पुढील तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व योगेश बारी करीत आहेत.