गोंदिया (अनमोल पटले) : तरुणाला आपल्या सौंदर्याच्या मोहात पाडून त्याच्यासोबत शरीरसंबंध करण्याचा देखावा महिलेने केला. त्यानंतर त्याला नग्नावस्थेत साथीदारांच्या मदतीने मारहाणीचा व्हिडिओ तयार केला. सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. पोलीस असल्याची बतावणी व हॅनीट्रप करणाऱ्या पाच जणांवर रामनगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गोंदियाच्या बिरजू चौकातील एक तरुण 23 नोव्हेंबरला दुचाकीने रिंगरोड गोंदियाकडे जात होता. दरम्यान एका महिलेने त्याला वाटेत थांबवले. तिने त्या तरुणास अंगूर बगीचा परिसरापर्यंत लिफ्ट मागितली. तिला तेथे सोडल्यानंतर तिने त्याचा मोबाईल क्रमांक देखील घेतला.
28 नोव्हेंबरला तिने त्या तरुणाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत बी. एम.डब्ल्यू बालाघाट रोड नजीक बोलावून घेतले. त्यानंतर ती त्याला कटंगीकडे घेऊन गेली. त्यानंतर भवानी चौकातील विजयनगरकडे गेल्यानंतर एका इमारतीत ती त्याला घेऊन गेली. त्या जागेवर अगोदरच एक महिला उपस्थित होती.
थोड्या वेळाने आलेल्या तिघांनी तरुणाला मारहाण करत विवस्त्र केले व या प्रकाराचा व्हिडीओ तयार केला. आपण पोलीस असल्याची बतावणी करत व्हिडीओ व्हायरल करण्याचा धाक दाखवून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तरुणाच्या फिर्यादीनुसार रामनगर पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि रघुवंशी करत आहेत.