जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गाच्या चौपदरीकरणासह विविध ठिकाणी उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. जळगाव शहरातून जाणा-या आकाशवाणी (सरसेनापती वैद्य) चौकात रोटरी सर्कलचे काम देखील सुरु आहे. मात्र या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून तापी पाटबंधारे महामंडळाने अतिक्रमणात मोठी जागा व्यापली आहे. सदर अतिक्रमण काढण्याबाबत वेळोवेळी आवाज उठवण्यात आला व बातम्या देखील प्रकाशित झाल्या. मात्र तापी पाटबंधारे विभागाच्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकारी वर्गाला कुंभकर्णी झोप लागली आहे की ते झोपेचे सोंग घेत आहेत? असा प्रश्न लोक उघडपणे विचारात आहेत.
याबाबत माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरुच ठेवला आहे. या पाठपुराव्याचा एक भाग म्हणून जळगाव मनपाने आदेशाऐवजी पाटबंधारे विभागाला अतिक्रमण काढण्याची विनंती करणारे पत्र रवाना केले होते. मात्र जळगाव मनपाच्या या विनंती पत्राला तापी पाटबंधारे विभागाने त्याच वेळी केराच्या टोपलीचे दर्शन घडवले.
आता राजमार्ग प्राधिकरण विभागाचे जळगावचे सुप्रीमो सिन्हा यांनी एक नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत अतिक्रमनाने व्याप्त जागा मोकळी करुन देण्याबाबत सदर नोटीस आहे. आता बघूया या नोटिसची फलश्रुती काय होते ती?