जळगाव : जळगाव शहराच्या मेहरुण तलाव परिसरातील महिला प्राचार्या कृष्णा मनिष कठुरिया यांच्या बंद घराचा कडीकोंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी हातसफाई केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्राचार्या कृष्णा कठुरीया यांचे पती मनीष कठुरीया यांचे अपघाती निधन झाले असून त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरी निमित्त राहतो. प्राचार्या कृष्णा कठुरिया या अमरावती येथील इंग्रजी शाळेत नोकरीला असून तेथेच राहतात. त्यामुळे त्यांचे जळगाव येथील मेहरुन तलाव परिसरातील घर नेहमी बंदच असते.
10 नोव्हेंबर रोजी जळगाव येथील घरात पतीचा विधी कार्यक्रम आटोपून कृष्णा कठुरीया पुन्हा अमरावती येथे नोकरीच्या ठिकाणी निघून गेल्या होत्या. तेव्हापासून त्यांचे घर बंद असल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला.
4 डिसेंबर रोजी सायंकाळी कृष्णा कठुरीया यांना त्यांच्या जळगाव येथील घराशेजारी राहणारे सागर जाधव यांचा फोन आला. त्यानंतर त्यांना समजले की त्यांच्या घराचे कुलूप व कडीकोंडा तुटलेला आहे. आपल्या घरात चोरी झाली असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी 7 डिसेंबर रोजी जळगाव येथील घर गाठले.
घरातील 8000/- रुपये किंमतीचे दोन डेल कंपनीचे लॅपटॉप, 2000/- रुपये किंमतीची अशोक इंडिया कंपनीची पाण्याची मोटर, 2000/- रुपये किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा , बाथरुममधील पाण्याचा स्टीलचा नळ, पितळी घंटी, मोटार सायकल व चार चाकी वाहनाचे आरसी बुक, दोघा पती पत्नीच्या नावाचे ड्रायव्हींग लायसन्स, डेबीट व एटीएम कार्ड असा 12 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे करीत आहेत.