अमरावती : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत अनेकांना ठगणा-या भोंदू बाबाने सहाय्यक पोलिस निरीक्षकालाच एसीबीच्या जाळ्यात फसवले आहे. पैशांचा पाऊस पाडून दाखवतो असे खोटे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयात फसवणा-या महाराजाविरुद्ध लोहारा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कथित महाराजाचा जामीन होण्याच्या दृष्टीने मदत करण्याकामी लाचेच्या रुपात सहायक पोलिस निरीक्षक अनिल घुगल यांनी त्याच्याकडे सुरुवातीला दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. घासाघीस अर्थात तडजोडीअंती सात लाख रुपयात लाच देण्याघेण्याचे ठरले. मात्र भोंदू महाराजाला लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती.
एसीबीच्या सापळ्यात दोघा खासगी व्यक्तीसह सहायक पोलीस निरीक्षक अनिल घुगल यांना रंगेहाथ पकडण्यात आले. विद्युत वसानी व विशाल माकडे (दोघे रा. यवतमाळ) अशी अटकेतील दोघा खासगी व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.