जळगाव : रेशन धान्याचा काळा बाजार होत असल्याचा कथित आरोप असणाऱ्या 123 दुकानदारांना महसूल प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी माहिती अधिकार तथा सामाजीक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिली होती.
या पार्श्वभूमीवर 123 दुकानदारांना नोटीस बजावली आहे. यापैकी 47 दुकानदारांविरुद्ध मोठ्या प्रमाणात ओरड वजा तक्रार असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व 47 दुकानदारांनी आपले म्हणणे दाखल्याच्या रुपात लेखी स्वरुपात जिल्हाधिका-यांना आज दिले आहे. या सर्व 47 दुकानदारांचा दाखल्यातील मजकूर एकसमान असून एक अक्षर देखील इकडे तिकडे नाही. महापौर, उप-महापौर यांच्यासह या 47 दुकानदारांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या 47 जणांमध्ये भगत बालाणी यांचा देखील दाखला आहे. तो दाखला आपण दिलाच नसल्याचे भगत बालाणी यांनी दीपककुमार गुप्ता यांना सांगितले आहे. याबाबत भगत बालाणी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
जळगाव परिसरातील 123 धान्य दुकानदारांनी धान्याची उचल केली नसतांना देखील तसे दर्शवण्यात आले असल्याचा आरोप आहे. निरक्षर लाभार्थ्याचे ठसे घेवून त्यांचे धान्य आले नसल्याची बतावणी कित्येक रेशन दुकानदारांकडून केली जात असल्याचा आरोप देखील गुप्ता यांनी केला आहे.







