जळगाव : जळगाव शहर व परिसरात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या कथीत रेशन घोटाळयाची महापौर जयश्री महाजन यांनी कबुली दिल्याचे उघड झाले आहे. कथित रेशन घोटाळयातील 47 संशयीत दुकानदारांनी आज जिल्हाधिका-यांना खुलासारुपी दाखला दिला आहे. या 47 दुकानदारांनी जिल्हाधिका-यांना लेखी स्वरूपात खुलासारूपी दाखले दिले आहेत. या दाखल्यात कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे म्हटले आहे. मात्र त्यात नोव्हेंबर महिन्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी रेशन दुकानदारांच्या यादीतील जळगावच्या महापौर तथा प्रथम नागरिक जयश्री महाजन यांच्याशी फोनवर वार्तालाप केला. त्यात मेहरूण येथील दुकानाच्या बाबतीत डिसेंबर महिन्यात कोणत्याही प्रकारची गडबड नसल्याचे महापौरांनी म्हटले आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात तक्रारी आल्याचे देखील कबूल केले आहे. नोव्हेंबर महिन्यातील गडबड डिसेंबर महिन्यात दुरुस्त केली असल्याचे महापौरांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे.
नगरसेवक भगत बालाणी यांच्या सहीच्या खुलासारुपी दाखल्यात अशाच स्वरूपाचा मजकुर आहे. मात्र ते पत्र आपण दिलेच नसल्याचे भगत बालाणी यांनी गुप्ता यांना सांगितले आहे. अशा प्रकारे भगत बालाणी यांचे ते पत्र वादात सापडले आहे.
जळगाव शहर व परिसरात रेशन धान्याचा काळा बाजार होत असल्याचा कथित आरोप असणाऱ्या 123 दुकानदारांना महसूल प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी माहिती अधिकार तथा सामाजीक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिली होती.
या पार्श्वभूमीवर 123 रेशन दुकानदारांना महसुल प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यापैकी 47 दुकानदारांविरुद्ध मोठ्या प्रमाणात ओरड वजा तक्रार असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व 47 दुकानदारांनी आपले म्हणणे दाखल्याच्या रुपात लेखी स्वरुपात जिल्हाधिका-यांना दिले आहे. या सर्व 47 दुकानदारांच्या दाखल्यातील मजकूर एकसमान असून एक अक्षर देखील इकडे तिकडे नाही. महापौर, उप-महापौर यांच्यासह या 47 दुकानदारांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निरक्षर लाभार्थ्याचे ठसे घेवून त्यांचे धान्य आले नसल्याची बतावणी कित्येक रेशन दुकानदारांकडून केली गेल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे.









