जळगाव : योग्य वेळ आणि बुद्धी या दोन्ही घटकांचा समन्वय मनुष्याला साधता आला पाहिजे. योग्य वेळी योग्य बुद्धीचा वापर करणारी व्यक्ती जग जिंकते. कित्येकदा योग्य वेळ असते मात्र तेव्हा योग्य ती बुद्धी नसते. जेव्हा बुद्धी आलेली असते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मनुष्याकडून सर्वाधिक चुका घडण्याची दाट शक्यता त्याच्या उमेदीच्या आणि भरभराटीच्या कालावधीत असते. तरुणपणाचा जोश अंगी असतांना कित्येक तरुण कुणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. बहुदा तळागाळातील तरुणांच्या अंगी हा दोष अनेकदा दिसून येतो.
जळगाव शहरातील आदित्य चौक रामेश्वर कॉलनी परिसरात पवन मुकुंदा सोनवणे हा तरुण रहात होता. वयाची पंचविशी गाठलेल्या पवनच्या अंगी भलताच जोश होता. रहात असलेल्या परिसरात तो आपले वर्चस्व दाखवण्यासाठी प्रयत्नशील रहात होता. आपल्या विरुद्ध बोलणा-या आणि वागणा-यासोबत दोन हात करण्याची तयारी तो ठेवत असे. घातक शस्त्र देखील तो बाळगत असे. पवन याच्याविरुद्ध पोलिस स्टेशनला पंधरा गुन्हे दाखल होते. त्यामुळे “घातक” या नावाने तो रहात असलेल्या एरियात लोकांना परिचित होता. त्याच्या पवन या नावाऐवजी लोक त्याला “घातक” या नावानेच ओळखत होते. बालपणापासून तरुणपणाच्या पंचविशीपर्यंत तो वर्चस्वाची लढाई लढत आला होता. आपण एरियाचे दादा आहोत हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात त्याचा वेळ आणि त्याची शक्ती खर्ची पडत होती.
तो रहात असलेल्या परिसरापासून जवळच असलेल्या सिद्धार्थ नगरात सागर पुनम कंडारे आणि विशाल विजय सपकाळे हे दोघे तरुण रहात होते. ते देखील एरियात आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. या वर्चस्ववादातून घातक आणि सागर व विशाल यांच्यात कित्येकदा वादाची ठिणगी पडत असे. किरकोळ वाद कधीकधी पराकोटीला जात असे. 4 डिसेंबर 2021 च्या रात्री पावणे अकरा वाजता कमी अधिक प्रमाणात मद्यपान करुन घातक घरी आला. घरी आल्यानंतर तो जेवण करण्यास बसला. त्याचवेळी बाहेर गल्लीत आरडाओरड सुरु असल्याचा आवाज त्याला आला. सागर कंडारे आणि विशाल सपकाळे हे दोघे जण कुणाशी तरी वाद घालत होते. त्या वादातून सागर हा जोरजोरात ओरडत होता. “तुमच्या एरियाचा दादा पवन घातक याला बोलव. तो खुप माजला आहे, त्याला सुद्धा बघून घेतो” अशा प्रकारचा संवाद जेवण करत असलेल्या घातकच्या कानावर आला. आपल्या नावाचा वापर होत असल्याचे ऐकून घातक तसाच उठला व बाहेर आला. त्यावेळी सागर व अमोल चौधरी यांच्यात वाद सुरु असल्याचे त्याला दिसून आले.
आपल्या नावाचा काय उल्लेख आला याबाबत घातकने दोघांना जाब विचारण्यास सुरुवात केली. घातक व सागर या दोघात वादाची ठिणगी पडली. दोघात बाचाबाची होण्यास वेळ लागला नाही. घातक व सागर असे दोघे जण वाद घालत काही अंतरावर गेले. दोघात सुरु असलेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत होणार असल्याचा अंदाज त्याचा भाऊ आणि आई या दोघांना आला होता. त्यामुळे तेदेखील त्यांच्या मागेमागे गेले. घातकने सागर कंडारे या विचारले की तू माझे नाव का घेतो. तुझ्या व अमोलच्या वादात माझा काय संबंध आला? वाद सुरु असतांना सागरने घातकसह त्याच्या आईला शिवीगाळ केली.
आपल्यासोबत आपल्या आईला शिवीगाळ केल्याचे बघून घातक चिडला. चिडलेला घातक सागरच्या अंगावर धावून गेला. वाद उग्र रुप धारण करत असल्याचे बघून सागर व विशाल या दोघांनी घातकच्या दिशेने दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत घातक जखमी झाला. त्याच्या डोक्यातून व तोंडातून रक्त निघू लागले. घातक जखमी झाल्याचे बघून सागर व विशाल हे दोघे पलायन करु लागले. मात्र दगडांचा मार बसल्यामुळे चवताळलेला घातक पेटून उठला. लाकडी दांडा हातात घेत तो दोघांच्या मागे धावत सुटला. घातक दोघा हल्लेखोरांच्या मागे धावत असल्याचे बघून त्याची आई व भाऊ हे दोघे देखील त्याच्या मागेमागे गेले. चिडलेल्या घातकने दोघांना हातातील बेसबॉलच्या दांड्याने मारहाण सुरु केली. प्रतिउत्तरादाखल दोघांनी घातकच्या दांडक्याने त्यालाच मारहाण सुरु केली.
जवळच असलेल्या साईबाबा मंदीराच्या मागील गल्लीत विशालने घातक यास मागच्या बाजूने घट्ट पकडून ठेवले. विशालने घातकला पकडून ठेवल्याचे बघून सागरने त्याच्या पोटावर, मानेवर, पाठीवर आणि डोक्यावर चाकूचे सपासप घाव घालण्यास सुरुवात केली. अगोदरच दगडांच्या व लाकडी दांड्याच्या मारहाणीत जखमी झालेला चाकूच्या घावामुळे धारातीर्थी पडला. या मारहाणीचे दृश्य बघण्यासाठी गर्दी जमा होण्यास वेळ लागला नाही. लोकांची गर्दी जमा होत असल्याचे बघून सागर व विशाल हे दोघे तेथून पळून गेले.
रक्ताच्या थारोळयात पडलेल्या घातक यास त्याचा भाऊ प्रतिक याने चुलत भाऊ अजयच्या मदतीने मोटार सायकलवर मध्यभागी बसवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. घातकची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीवनमरणाच्या सिमारेषेवर घातक निपचीप पडला होता. डॉक्टरांच्या मदतीने तो मृत्युसोबत झुंज देत होता. या हल्ल्याची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता तसेच पो.नि. प्रताप शिकारे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, मिलिंद सोनवणे, गफ्फार तडवी, सचिन पाटील, दीपक चौधरी, रविंद्र चौधरी, इमरान सैय्यद, किशोर पाटील, सुधीर साळवे, मुकेश पाटील आदींनी घटनास्थळ गाठले. घटनास्थरील उपस्थित जमावाच्या माध्यमातून पोलिस अधिका-यांनी हकीकत समजून घेतली. पोलिस अधिका-यांनी हल्लेखोरांची नावे निष्पन्न करत त्यांच्या मागावर एक पथक रवाना केले. ज्या रुग्णालयात जखमी घातक दाखल होता त्या रुग्णालयात जावून त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. याप्रकरणी जखमी घातक याचा भाऊ प्रतिक सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार सागर पूनम कंडारे व विशाल विजय सपकाळे या दोघांविरुद्ध भा.द.वि. 307, 504, 506, 34 नुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान जखमी घातक रुग्णालयात मृत्युशी झुंज देतच होता. मात्र मृत्युसोबत कडवी झुंज देऊन देखील घातक अपयशी ठरला. त्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे याप्रकरणी 302 हे कलम दोघा हल्लेखोरांविरुद्ध वाढवण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोघा हल्लेखोरांना मेहरुण बगीचा परिसरात शोधून अटक केली होती. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला दोघांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान गुन्हयात वापरण्यात आलेला चाकू व तुटलेला लाकडी दांडा जप्त करण्यात आला.
एरियाचा दादा म्हणवणा-या घातक याचे सागर व विशाल या दोघांसोबत गेल्या एक वर्षापासून वाद सुरु होते. मयत घातक व अटकतील दोघा जणांविरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. मयत घातक व अटकेतील दोघे तरुण पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आहेत. मयत घातक हा एमआयडीसी पोलिसांच्या अभिलेख्यावारील गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. अटकेतील सागर व पुनम यांच्याविरुद्ध तिन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, मिलिंद सोनवणे, गफ्फार तडवी, सचिन पाटील, दीपक चौधरी, रविंद्र चौधरी, इमरान सैय्यद, किशोर पाटील, राजेंद्र कांडेकर, सुधीर साळवे, मुकेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दीपक जगदाळे व सचिन मुंडे करत आहेत.