मुंबई : शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची पुनश्च प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी सन 2017 मधे त्यांनी हा पदभार घेतला होता. राज्य सरकारने या बाबत अधिसूचनेद्वारे घोषणा केली होती. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदासाठी आदेश बांदेकर यांचे नाव सुचवले होते.
आदेश बांदेकर 24 जुलै 2017 रोजी प्रथमच या ट्रस्टचे अध्यक्ष झाले होते. आगामी तीन वर्षांसाठी 24 जुलै 2020 पावेतो ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपदी राहणार होते. मात्र आता पुन्हा नव्याने त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता कुठल्याही संस्था, संघटनांच्या निवडणुका होत नाही. या काळात देवस्थाने देखील बंद आहेत. त्यामुळे आदेश बांदेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
ज्या मंदिराच्या रांगेत आपण उभे रहात होतो त्याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आपल्याला मोठी जबाबदारी मिळाली असल्याचे आदेश बांदेकर यांनी म्हटले आहे. भाविक व देवाची सेवा करण्याची संधी मिळणार असल्याने आपण ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे त्यांनी पहिल्या निवडीच्यावेळी म्हटले होते.