जळगाव : राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे. नागरिक पोलिसांकडे आपल्या अडी-अडीचणी, समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या समस्या सोडविणे हे पोलिसांचे कर्तव्य असल्याने त्या सोडविण्यास पोलिसांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुंबई यांच्याकडून बांधण्यात आलेल्या जळगाव येथील 252 पोलीस कर्मचारी निवासस्थान इमारती तसेच राखीव पोलीस निरिक्षक कार्यालय इमारतीचे उदघाटन समारंभाप्रसंगी गृहमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर श्रीमती जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहारनिरीक्षक डॉ बी जी शेखर- पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक उपस्थित होते.
गृहमंत्री म्हणाले की, आज 252 सदनिकांचे वितरण करतांना मला खुप आनंद होत आहे. या सदनिका सुसज्ज असून बांधकामाचा दर्जा देखील चांगला आहे. घर चांगले असेल तर कुटुंब आनंदी राहते आणि सहाजिकच याचा सकारात्मक परिणाम पोलिसांच्या कामावर होणार आहे. टप्पा 2 चे काम पूर्ण करण्यासाठी निधींची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्यातील पोलिस स्टेशनच्या विकासाला प्राधान्य देताना प्राधान्याक्रमानुसार पोलिस स्टेशनचा दर्जा वाढविण्या बाबतही विचार करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची एकत्रित जबाबदारी असल्याचे सांगून पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीची दखल घेऊन त्यावर कार्यवाही होणे आवश्यक असल्याचेही गृहमंत्री म्हणाले.
यावेळी गृहमंत्री यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पाच पोलीस कर्मचाऱ्यांना घराची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कोरोना काळात जळगाव जिल्हा पोलीस दलाने चांगली भूमिका बजावली आहे. यापुढेही जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी जळगाव आणि भुसावळ शहरात सीसीटीव्ही बसविणे आवश्यक असून यासाठी दहा कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. पोलिस दलाला 36 चारचाकी तसेच 30 दुचाकी वाहने जिल्हा वार्षिक योजनेतून दिली आहेत आणखी वाहनांची आवश्यकता असल्याने वाहन खरेदीसाठी २ कोटी निधींची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर हे ऑनलाईन सहभागी झाले होते. या कार्यक्रमास जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय उपस्थित होते.